निर्बंध खुले होताच, नागरिक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:13 AM2021-06-02T04:13:12+5:302021-06-02T04:13:12+5:30
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट दहा टक्क्यांच्या आत असल्याने, जिल्ह्यातील दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ...
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट दहा टक्क्यांच्या आत असल्याने, जिल्ह्यातील दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल दोन महिन्यांनी दुकाने उघडल्याने बाजारात चैतन्य दिसून आले. सकाळपासूनच लोक घराबाहेर पडल्याने, अनेक रस्त्यांवर वाहतूककोंडीही झाली. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा, मेनरोड, भद्रकाली मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी उसळली.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहारालाही निर्बंध शिथिलतेमुळे चालना मिळाली. पंचवटी मार्केट कमिटीसमोरील बाजारपेठेतही नेहमीप्रमाणेच गर्दी झाली होती. महात्मा गांधी रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर शालिमार चौकही गजबजला. गंगापूररोडवर वाहनांची वर्दळ झाली होती.
सलून, बेकरी, स्वीट मार्ट दुकाने सुरू करण्याबाबत स्पष्टता नसल्याने, या दुकानदारांमध्ये संभ्रमाची परिस्थिती होती. अशाही परिस्थितीत त्यांनी दुकाने सुरू ठेवली. हार्डवेअर दुकानांमध्ये मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले, तर घरदुरुस्तीसाठी लागणाऱ्या साहित्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.