प्रतिभूती मुद्रणालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:29 AM2018-08-26T00:29:53+5:302018-08-26T00:30:13+5:30
करन्सी नोट प्रेसमधील चलनी नोटांची गोपनीयता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अत्याधुनिक इंटेग्लिओ (उत्कीर्ण) प्लेट बनविण्याच्या तंत्रज्ञानाने युक्त नवीन यंत्राचे उद्घाटन अर्थ मंत्रालयाचे आर्थिक कार्य विभाग सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले.
नाशिक : करन्सी नोट प्रेसमधील चलनी नोटांची गोपनीयता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अत्याधुनिक इंटेग्लिओ (उत्कीर्ण) प्लेट बनविण्याच्या तंत्रज्ञानाने युक्त नवीन यंत्राचे उद्घाटन अर्थ मंत्रालयाचे आर्थिक कार्य विभाग सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भारत प्रतिभूमी मुद्रण तथा मुद्रा निर्माण महामंडळाच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तृप्ती पी. घोष, संचालक एस. के. सिन्हा, ए. के. श्रीवास्तव, करन्सी नोट प्रेसचे महाप्रबंधक एस. पी. वर्मा, भारत प्रतिभूमी मुद्रणालयाचे महाप्रबंधक सुधीर साहू आदी अधिकारी उपस्थित होते. नाशिक प्रतिभूती मुद्रणालयात (नोटप्रेस) सुरू करण्यात आलेली ही आधुनिक प्रणाली आशिया खंडातील पहिल्यांदाच नशिकमधील नोटप्रेस मध्ये सुरू करण्यात आली आहे. संगणकाद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून इंटेग्लिओ प्रिंटिंगसाठी लागणारी इंटेग्लिओ प्लेट तयार करण्याची ही उच्च प्रणाली असून, ही प्रणाली देशाच्या मुद्रण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बँक, नोट मुद्रणाच्या सुरक्षितेत अधिक भर घालणारी असल्याचे सुभाषचंद्र गर्ग यांनी सांगितले. करन्सी नोट प्रेस जागतिक स्तरावर एक अत्याधुनिक बँक नोट मुद्रणालय म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, गर्ग यांनी नोटप्रेसमधील विविध उत्पादन विभागांना भेट देऊन यंत्राची सविस्तर माहिती घेतली. नोट छपाईच्या यंत्राचे निरीक्षण करतानाच अन्य सुरक्षा मानकांची माहितीही त्यांनी जाणून घेतली.