‘ऐका हो ऐका’चा आवाज लुप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 09:52 PM2020-07-24T21:52:23+5:302020-07-25T01:09:56+5:30
लखमापूर : ग्रामीण भागातील अनेक प्रथा, रूढी व परंपरा काळाच्या ओघात लुप्त होत आहेत. त्यातील एक प्रथा म्हणजे दवंडी. आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ही प्रथा बंद पडल्याने ग्रामीण भागात ‘ऐका हो ऐका’चा कानांवर पडणारा स्वर दुर्मीळ झाला आहे.

ग्रामीण भागात पूर्वी दवंडीला महत्त्व होते. गावातील ग्रामपंचायती-मार्फत एका विशिष्ट व्यक्तीची निवड केली जात होती. त्या व्यक्तीला गावामध्ये दवंडी देण्यासाठी ठरावीक रोजंदारीवर नेमण्यात येत असे. एका गावातून एकच मनुष्य हे काम करीत असे. गावात काही धार्मिक विधी, विवाहाचे निमंत्रण, ग्रामसभेसाठी लोकांना एकत्र जमविण्यासाठी दवंडीला विशेष महत्त्व होते. मात्र मोबाइल, तंत्रज्ञानाने विकासात्मक बदल झाल्याने काही गावातील चित्र बदलले आहे. दिंडोरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये दवंडी प्रथा काळाच्या पडद्याआड गेली आहे.
मी वयाच्या १६व्या वर्षापासून गावामध्ये दवंडी देण्याचे काम करीत होतो. आम्हाला शासनाचे कोणतेच मानधन नाही. आता माझे वय ७५ वर्षं आहे. पूर्वी दवंडी दिल्यानंतर लोक आम्हाला आनंदाने दक्षिणा देत. त्यामुळे आमचा संसार चालायचा. परंतु आता दवंडी बंद झाली. यामुळे शासनाने गावामध्ये दवंडी देणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबासाठी काहीतरी उपाययोजना करून मानधन द्यावे.
- दवंडीकार, लखमापूर