संबळ वाद्याचे स्वर झाले दुर्मिळ
By admin | Published: February 10, 2017 10:43 PM2017-02-10T22:43:41+5:302017-02-10T22:43:55+5:30
संबळ वाद्याचे स्वर झाले दुर्मिळ
पेठ : लग्नकार्य म्हटले की वाजंत्री आलीच. पूर्वी लग्नकार्यात दोन-तीन दिवस लग्नघरी ठाण मांडून बसलेले संबळ वाजंत्री आजच्या आधुनिक तंत्रज्ञानात डीजेच्या कर्ण कर्कश आवाजात हरवून बसली असून, पारंपरिक संबळ वाद्य दुर्मिळ झाले आहे.
पूर्वीच्या काळी लग्नकार्यात मांडवापासून तर सत्यनारायण विधीपर्यंत पारंपरिक संबळवादन प्रसिद्ध होते. संबळबरोबर पिपाणी व भोंगा यावर विविध चालींवर गाणी वाजवली जात. लय, ठेका व स्वर यांचा एकत्रित मिलाप करून असे वाद्य वाजवले जात. पावरी, कावडी, नारायण, हनुमान यांसारख्या पारंपरिक ठेक्यावर व्हराडीमंडळी ताल धरून नाचण्यात दंग होत. मात्र सद्याच्या आधुनिक युगात डीजेचा जमाना आला असून, मोठमोठ्या स्पिकरच्या साह्याने रिमिक्स गाणे वाजवून केलेला धांगडधिंगा केला जातो.
हा सर्व प्रकार पाहिल्यावर पुन्हा एकदा संबळ युगात जाण्याची इच्छा प्रकट होते. महागाईच्या जमान्यात लाखो रु पये सुपारी देऊन डीजे लावण्याच्या शर्यतीत संबळ वाजंत्री मात्र मागे पडताना दिसून येत आहे. (वार्ताहर)