दक्षिणेकडील कांदा बाजारात; भावात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:44 AM2018-10-26T00:44:25+5:302018-10-26T00:47:15+5:30
लासलगाव : दक्षिण भारतातील नवीन कांद्याची बंगळुरू येथील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाल्याने अन्य बाजारांमधून उन्हाळ कांद्याला असलेली मागणी कमी झाली आहे. परिणामी येथील आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत गुरुवारी कांद्याच्या दरामध्ये क्विंटलमागे ९५ रुपयांची घट झाली आहे.
लासलगाव : दक्षिण भारतातील नवीन कांद्याची बंगळुरू येथील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाल्याने अन्य बाजारांमधून उन्हाळ कांद्याला असलेली मागणी कमी झाली आहे. परिणामी येथील आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत गुरुवारी कांद्याच्या दरामध्ये क्विंटलमागे ९५ रुपयांची घट झाली आहे.
बंगळुरू येथील कांदा बाजारपेठेत गुरुवारी एक लाख सत्तर हजार नवीन कांदा गोण्यांची आवक झाली. दक्षिणेतील राज्यातून नवीन कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे मागील पंधरवड्यात २५५० रुपयांपर्यंत असणारे कांदा भाव कमी झाले. या सप्ताहात भावात ५०० रुपयांची घसरण झाली. अन्य बाजारपेठांमधून मागणी कमी झाल्याने लासलगावला सरासरी भाव १३०० रुपयांच्या आसपास आहेत. दरम्यान, गुरुवारी येथे बाजारभाव ९५ रुपयांनी कमी झाले आहेत. दक्षिणेतील राज्यांमधील नवीन कांदा बाजारात आल्याने गेले काही दिवस भाव खाणारा उन्हाळ कांदा मंदीकडे वाटचाल करीत असल्याचे कांदा व्यापारी नितीनकुमार जैन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
लासलगाव बाजार समितीत गुरुवारी उन्हाळ कांदा भावात आदल्या दिवसापेक्षा ९५ रुपयांची घट झाली. कमाल भाव १९१२ रुपये तर सरासरी भाव १४६० रुपये राहिला. चालू सप्ताहात सरासरी भावात २५० रुपयांची घट झाली आहे.
लासलगावच्या बाजारपेठेत नेहमी आॅक्टोबर महिन्यात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते; परंतु यंदा विलंबाने आलेला पाऊस व नंतर त्याने दिलेली ओढ यामुळे खान्देशातील कांदा अद्याप बाजारात आलेला नाही. दि. २२ रोजी लासलगाव बाजारपेठेत नवीन लाल कांद्याची आवक १८० क्विंटल झाली. भाव कमाल १४०० रुपये राहिला.किरकोळ तेजीतचघाऊक बाजारात कांद्याचे दर कमी होत असले तरी किरकोळ बाजारात मात्र कांद्याचे भाव तेजीतच आहेत. नाशिक शहरात सुमारे २५ रुपये तर मुंबईमध्ये कांदा ५० रुपये प्रतिकिलो या दराने विकला जात आहे. कांद्याच्या या दरवाढीने सर्वसामान्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आले आहे.