नांदूरशिंगोटे परिसरातील पेरण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:10 AM2021-06-20T04:10:51+5:302021-06-20T04:10:51+5:30

नांदूरशिंगोटे : येथे व परिसरात खरीप हंगामपूर्व शेतीच्या मशागतीची कामे आटोपली आहेत. आता वरुणराजाच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे. शेतकऱ्यांनी ...

Sowing in Nandurshingote area was delayed | नांदूरशिंगोटे परिसरातील पेरण्या रखडल्या

नांदूरशिंगोटे परिसरातील पेरण्या रखडल्या

Next

नांदूरशिंगोटे : येथे व परिसरात खरीप हंगामपूर्व शेतीच्या मशागतीची कामे आटोपली आहेत. आता वरुणराजाच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे. शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खतांची जुळवाजुळव करून ठेवली असून, पाऊस लांबल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. परिसरातील काही ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या असून, काही भागात पेरण्यांना मुहूर्त लागलेला नाही. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने व यावर्षीदेखील भरपूर पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मान्सूनपर्व पावसाने परिसरात हजेरी लावली होती. त्यानंतर मृग नक्षत्रास प्रारंभ झाला. जिल्ह्यात ठिकठिकाणी मृग नक्षत्राचा समाधानकारक पाऊस पडत असताना परिसरातील काही भाग कोरडाठाक आहे. शेतकऱ्यांनी शिवार लागवडीसाठी तयार करून टंचाई होऊ नये म्हणून खताची तरतूददेखील करून ठेवली आहे. नांदूरशिंगोटे येथे व परिसरात शेतकरी प्रामुख्याने सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांची लागवड करतात. मान्सूनपूर्व सरी कोसळल्याने व मृग नक्षत्राच्या आगमनाची चाहूल लागताच गत आठवड्यात बियाणे खरेदीसाठी कृषी दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरात शेतमालाचा भाव पडला होता. अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आले होते. त्यातच बी-बियाणे व खतांच्या दरवाढीने शेतकरी हतबल झाला असून, दहा दिवसापासून मृग नक्षत्राने पाठ फिरवल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

-------------------

इन्फो... ढग जमा होतात अन् निघून जातात

नांदूरशिंगोटे परिसराला जून महिन्यात पावसाने चांगलीच हुलकावणी दिली असून, दिवसभर कडाक्याचे ऊन आणि सायंकाळी ढगांच्या गर्दीमुळे येथील शेतकरी चिंतित झाला आहे. ढग जमा होतात आणि निघून जातात, असे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे शेतीचा घसा आणखी किती दिवस कोरडा राहणार ते निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. इन्फो... पावसाची प्रतीक्षा तालुक्यातील दापूर व दोडी परिसरात मान्सूनपूर्व पावसाने मध्यंतरी जोरदार हजेरी लावली. परिसरातील काही भागात कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली. काही भागत चांगला पाऊस झाल्याने पेरणी आटोपली आहे. परंतु गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. जमिनीतील ओल कमी होऊ लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Web Title: Sowing in Nandurshingote area was delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.