रोपे नसल्याने थेट कांदा बियाणांची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 05:52 PM2019-12-17T17:52:00+5:302019-12-17T17:52:22+5:30
शेतकऱ्यांनी शोधला उपाय : कमी वेळात कमी मशागतीत प्रयोग
जळगाव नेऊर : परतीच्या पावसामुळे जमिनीतच सडलेली कांद्याची रोपे, वाढत्या बाजारभावामुळे रोपांना आलेला सोन्याचा भाव, बाजारात लागवडीसाठी रोपांची वाढती टंचाई यामुळे शेतकऱ्यांनी आता त्यावर उपाय शोधत पेरणी यंत्राच्या सहाय्याने कांदा लागवड न करता थेट कांदा बियाणे पेरणीवर भर दिला आहे. कमी वेळात आणि कमी मशागतीत कांदा लागवड होत असली तरी शेतकऱ्यांनी सुरू केलेला हा प्रयोग यशस्वी झाला तर हजारो रु पयांची खर्चाची बचत होणार आहे.
सारे पाडणे, वाफे बांधणे हा खर्च टाळून थेट कांदा लागवड होत असल्याने तालुक्यातील शेतकरी यंत्राच्या सहाय्याने कांदा बियाणे पेरणीचा प्रयोग करत आहे. सध्या शेतकऱ्यांच्या लाल कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग कांदा लागवडीकडे वळला आहे. मात्र परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. शेतात पावसाचे पाणी साचल्याने कांदा रोपे वाया गेली. तर लाल कांदा अतिपाण्यामुळे सडला. परिणामी हातात येणारे पिक वाया गेले. पुन्हा नव्याने कांदा रोप तयार करावयाचे झाल्यास त्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे . त्यानंतर कांदा लागवड होईल. सदर कांदा ऐन उन्हाळ्यात काढणीस येईल. त्यातही त्यावेळच्या कडक उन्हामुळे कांदा जमिनीत येतो कि नाही याची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांनी आता कांदा पेरणीचा प्रयोग चालविला आहे. कांदा लागवडीसाठी येणारा एकरी सुमारे ८ हजार रु पये खर्च याबरोबरच सारे पाडणे, वाफे बांधणे यासाठी लागणा-या वेगळ्या खर्चाची बचत होणार आहे.