सोयाबीन, कापसाचे पीक धोक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:04 AM2018-08-18T01:04:33+5:302018-08-18T01:05:15+5:30
अगोदरच उशिराने केलेली पेरणी व त्यातच तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने मारलेल्या दडीमुळे नाशिक जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन व कापूस पीक धोक्यात आले असून, पावसाअभावी सोयाबीनला लागणाऱ्या फुलांच्या संख्येत घट झाली
नाशिक : अगोदरच उशिराने केलेली पेरणी व त्यातच तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने मारलेल्या दडीमुळे नाशिक जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन व कापूस पीक धोक्यात आले असून, पावसाअभावी सोयाबीनला लागणाऱ्या फुलांच्या संख्येत घट झाली तर कापसाचे बोंडाची वाढ खुंटल्यामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना त्यात आता या दोन्ही पिकांना किडीचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्ह्यात जून महिन्यात उशिराने मान्सूनचे आगमन झाल्यामुळे त्याचा पेरणीवर परिणाम झाला, परंतु जुलैच्या पावसाने शेतकºयांच्या आशा पल्लवीत होऊन जिल्ह्यात जवळपास जुलैअखेर ८८ टक्के पीक पेरण्या पूर्ण करण्यात आल्या. नाशिक जिल्हा खरीप पेरणीचा असल्यामुळे पूर्व भागात मका, बाजरी, सोयाबीन, तूर, भुईमुगाची लागवड करण्यात आली, तर पश्चिम भागात भात, नागलीच्या पेरण्या करण्यात येऊन पिकांना कोंब फुटेपर्यंत पावसाने हात दिला, परंतु त्यानंतर जवळपास तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने दडी मारली. जिल्ह्यातील एकूण लागवडीखाली क्षेत्रापैकी ५९,३४३ इतके क्षेत्र सोयाबीनचे असले तरी, यंदा मात्र त्यात वाढ करण्यात येऊन ६४,२६३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली तर कापसाचे क्षेत्र काहीसे घटले आहे. कापसाचे ४५,५३५ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी फक्त ३७,१५५ हेक्टर क्षेत्रावरच लागवड करण्यात आली. त्यामागे गेल्या वर्षी बोंडअळीने उभे पीक फस्त केल्यामुळे कापूस उत्पादक शेतकºयांमध्ये नैराश्य आल्याचे व पावसाने दीर्घ दडी मारल्याचे कारण दिले जात आहे. आता दोन दिवसांपासून पावसाने काहीशी हजेरी लावली असली तरी, तत्पूर्वी या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव सुरू झाल्याचे कृषी खात्याचे म्हणणे आहे. सोयाबीनची पाने खाणारी अळी काही भागांत आढळली तर कापसावरही यंदा बोंडअळीची तसेच पिकाचे रस शोषणाºया किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. जुलैअखेर व आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनच्या शेंगा लागण्याअगोदर फुले लागण्यास सुरुवात होते व अशा वेळी पिकाला पाण्याची गरज असते; परंतु पाऊस नसल्यामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात आले, तीच परिस्थिती कापसाची असून, पिकाची पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत असताना कापसाची वाढ खुंटली परिणामी कापसाचे फूल फुलण्याअगोदर तयार होणाºया बोंडाची पाहिजे त्या प्रमाणात वाढ होऊ शकली नाही.