कोटमगाव परिसरात सोयाबीन पेरणीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 10:15 PM2021-06-08T22:15:54+5:302021-06-09T01:02:37+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील कोटमगाव खुर्द परिसरात मागील चार ते पाच दिवसांपूर्वी झालेल्या मान्सून पूर्वच्या समाधानकारक मुसळधार पावसामुळे येथील परिसरात खरीप हंगामातील सोयाबीन पिकांच्या पेरणीच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात केली असल्याचे दिसून आले आहे.
मानोरी : येवला तालुक्यातील कोटमगाव खुर्द परिसरात मागील चार ते पाच दिवसांपूर्वी झालेल्या मान्सून पूर्वच्या समाधानकारक मुसळधार पावसामुळे येथील परिसरात खरीप हंगामातील सोयाबीन पिकांच्या पेरणीच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात केली असल्याचे दिसून आले आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येवला तालुक्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस बरसला होता. त्यामुळे यंदा वेळेआधीच शेती मशागतींच्या कामांना शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती. कोटमगाव परिसरात मागील चार ते पाच दिवसांपूर्वी मान्सून पूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. आणि याच मुसळधार पावसाच्या भरवशावर येथील शेतकऱ्यांनी प्रामुख्याने सोयाबीन पिकांच्या पेरणीस पसंती दर्शवली आहे.
यंदा सोयाबीनच्या दराने आठ हजार रूपये प्रति क्विंटल चा टप्पा गाठला होता.त्यामुळे शेतकरी मोठ्या आशेने येथील परिसरात सोयाबीनची पेरणी करताना दिसून येत आहे. पाऊस समाधान कारक पडत असल्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे, रासायनिक खते खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन च्या अनेक नवनवीन बियाणांची वाने सध्या बाजारात विक्रीसाठी आले असून दरवर्षी पेरण्यात येणाऱ्या वाणाची मात्र यंदा तुटवडा जाणवत असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान पावसाच्या भरवशावर पेरणी सुरू असली तरी यापुढे शेतकऱ्यांना दमदार पावसाची शेतकऱ्यांना गरज असून पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडणार असल्याचे देखील शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.
मुसळधार पावसाच्या भरवशावर जमिनीत बऱ्यापैकी ओलावा निर्माण झाल्याने आम्ही सोयाबीन पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. सोयाबीन च्या चांगल्या वाणाची कमतरता असून मिळेल ते बीयाने घेऊन पेरणी चालू आहे. पेरणी झाल्यानंतर पण आम्हा शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा असून पाऊस न पडल्यास पुन्हा चिंता वाढणार आहे.
- गोकुळ कोटमे, शेतकरी, कोटमगाव खुर्द.
(०८ मानोरी १)
मुसळधार पावसाच्या भरवशावर कोटमगाव येथे ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुरू असलेली सोयाबीन पेरणी.