राष्टपतींच्या पाच हेलिपॅडसाठी जागेचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 03:14 PM2018-10-09T15:14:48+5:302018-10-09T15:15:30+5:30
नाशिक : भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी मूर्ती असलेल्या मांगीतुंगी येथे येत्या २२ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या विश्वशांती अहिंसा संमेलनासाठी राष्टपती रामनाथ कोविंद हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर पहिल्यांदाच येत असल्यामुळे लष्कर व प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली असून, मांगीतुंगी येथे राष्टपतींच्या पाच हेलिकॉप्टरसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने जागेचा शोध घेण्यासाठी लष्कराच्या अधिका-यांनी तळ ठोकला आहे.
दोन वर्षांपूर्वी मांगीतुंगी पर्वतावर अखंड दगडावर जैन धर्मीयांचे आद्य भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट मूर्तीचे निर्माण करण्यात येऊन महामस्ताभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला होता. जैन साध्वी ज्ञानमती माताजी यांनी येत्या २२ आॅक्टोबर रोजी विश्वशांती अहिंसा संमेलनाचे आयोजन केले असून, त्यासाठी राष्टपतींना निमंत्रण देण्यात आले व त्यांनी या संमेलनासाठी येण्याची तयारी दर्शविल्याने यंत्रणेची धावपळ उडाली आहे. ओझर विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाल्यानंतर लष्कराच्या हेलिकॉप्टरने राष्टपती मांगीतुंगी येथे जाणार असल्याचा दौरा असला तरी, मांगीतुंगी येथे पाच हेलिकॉप्टरच्या हेलिपॅडसाठी १२ एकर जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. राज्यपाल, मुख्यमंत्रींसह अन्य मंत्रीही या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनासाठी वाहनतळासाठी दोन ठिकाणी जागेचा शोध सुरू आहे. गेल्या आठवड्यात लष्कराच्या वरिष्ठ अधिकाºयांनी मांगीतुंगी येथे जाऊन पाहणी केली तसेच राज्याच्या मुख्य सचिवांनीही भेट देऊन व्यवस्थेबाबत सूचना केल्या आहेत.