शहांच्या वक्तव्याने युतीत दरी विस्तारली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:38 AM2019-01-08T01:38:42+5:302019-01-08T01:39:06+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केली तर ठीक, नाही तर निवडणुकीच्या रिंगणात पटकून देऊ या भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या वक्तव्याने युतीमध्ये अगोदरच असलेला दुरावा विस्तारला असून, स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षाने जिल्ह्णातील तीनही लोकसभा मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले
नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केली तर ठीक, नाही तर निवडणुकीच्या रिंगणात पटकून देऊ या भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या वक्तव्याने युतीमध्ये अगोदरच असलेला दुरावा विस्तारला असून, स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षाने जिल्ह्णातील तीनही लोकसभा मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले, तर गुजराती भाजपामध्ये सेनेला उचलून पटकण्याचा दम नसल्याची खोचक प्रतिक्रिया शिवसेनेने व्यक्त केली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत नाशिक जिल्ह्णातील नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाबरोबरच, लागून असलेल्या धुळे मतदारसंघातूनही भाजपाने दणदणीत विजय मिळविला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत भाजपाकडे दोन, तर सेनेकडे एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असले तरी, आगामी निवडणुकीत युती होणार की नाही याविषयी अनिश्चितता आहे. सेनेने यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला असला तरी, भाजपा मात्र अजूनही युतीच्या आशेवर असतानाच लातूर येथे पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी सेनेला डिवचणारे वक्तव्य केल्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात उचलून पटकण्याची भाषा भाजपाने केल्यामुळे सेनेनेही तितकेच उसळून प्रतिक्रिया दिली असून, गुजराती भाजपामध्ये सेनेला उचलून टाकण्याचे दम नसल्याचे म्हटले आहे. शिवसेना घराघरात पोहोचली असून, पक्षाध्यक्ष ठाकरे यांनी यापूर्वीच युती होणार नसल्याचे जाहीर केलेले असताना उचलून टाकण्याइतका दम असलेल्या भाजपाने युतीसाठी सेनेला गळ घालण्याचे कारण काय? असा सवालही केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपानेदेखील स्वबळावर लढण्याइतपत ताकद जिल्ह्णातील तीनही मतदारसंघात निर्माण केली असून, शिवसेनेने युती केली, तर त्यांचाच फायदा होणार असल्याचे म्हटले आहे.
शिवसैनिक महाराष्टतील मातीत कुस्ती लढणारा असून, गुजरातींमध्ये त्यांना पटकण्याची ताकद नाही. अयोध्या, पंढरपूर येथे शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली असल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला आमची ताकद दिसेल. अमित शाह यांना पक्षाध्यक्ष ठाकरे प्रत्युत्तर देतील. - सुनील पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख
भारतीय जनता पक्षाने तीनही लोकसभा मतदारसंघात तयारी पूर्ण केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू आहे. शिवसेना युती करणार असेल, तर भाजपाच्या ताकदीचा त्यांना फायदाच होईल. अन्यथा भाजपा स्वबळावर लढण्यास तयार आहे. तशा सूचना पक्ष कार्यकर्त्यांनाही देण्यात आल्या आहेत. - दादा जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजपा