हवी ‘एसपीसीए’समिती : मुक्या जीवांना मिळणारी क्रूर वागणूक थांबणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:19 PM2018-07-30T22:19:36+5:302018-07-30T22:20:28+5:30
समिती गठित करण्याबाबत कुठलीही पावले उचलली जात नसल्याने मानव उत्थान मंचच्या वतीनने सोमवारी (दि.३०) अशोकस्तंभावरील पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली.
नाशिक : प्राण्यांवरील होणारे अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी ‘सोसायटी फॉर प्रिव्हेंशन क्रुएल्टी आॅन अॅनिमल’(एसपीसीए) नावाची समिती शहरात गठित करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाला दिले आहे; मात्र अद्याप समिती गठित करण्याबाबत कुठलीही पावले उचलली जात नसल्याने मानव उत्थान मंचच्या वतीनने सोमवारी (दि.३०) अशोकस्तंभावरील पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली.
राज्य सरकारने २००१ साली अध्यादेश काढून प्राणी क्रुरता प्रतिबंध समिती विविध जिल्ह्यांमध्ये गठित करावी, असे आदेश केंद्र सरकारच्या नियमानुसार दिले. त्यानंतर काही शहरांमध्ये अशाप्रकारची समिती गठित करण्याचे प्रयत्न सुरू झाले; मात्र राज्यात काही मोजक्याच शहरांमध्ये या प्रयत्नांना यश आले आहे. नाशिकमध्येही अशाप्रकारे समिती गठित करून या समितीद्वारे जिल्हाधिका-यांच्या नियंत्रणाखाली शहर व परिसरात जनावरांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याची मागणी मानव उत्थान मंचकडून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., यांच्याकडे करण्यात आली होती. यानंतर जिल्हाधिका-यांनी पशुसंवर्धन उपआयुक्तांसोबत चर्चा करून पंधरा सदस्य असलेली समिती शासनाच्या नियमानुसार गठित करण्याच्या सूचना दिल्या; मात्र यानंतर कुठल्याही प्रकारे प्रयत्न संबंधितांकडून होऊ शकले नाही, असा आरोप करत मंचाचे जसबीर सिंग, भारती जाधव, हेमंत जाधव, ज्योती ग्रोवर, प्रियंका वाघ, धनश्री कुलकर्णी, हेमल लडानी आदी प्राणिप्रेमींनी कार्यालयापुढे निदर्शने करीत नाशिकमध्ये ‘एसपीसीए’ का नाही? असा प्रश्न उपस्थित केला.