भुजबळ यांच्यावर उपचारासाठी विधानसभा अध्यक्षांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:54 AM2018-03-01T01:54:30+5:302018-03-01T01:54:30+5:30
महाराष्टसदन घोटाळ्याप्रकरणी आॅर्थररोड कारागृहात जामिनाच्या प्रतीक्षेत असलेले माजी उपमुख्यमंत्री व राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची कारागृहात प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर योग्य ते उपचार करावेत यासाठी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी थेट विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनाच साकडे घातले आहे.
नाशिक : महाराष्टसदन घोटाळ्याप्रकरणी आॅर्थररोड कारागृहात जामिनाच्या प्रतीक्षेत असलेले माजी उपमुख्यमंत्री व राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची कारागृहात प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर योग्य ते उपचार करावेत यासाठी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी थेट विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनाच साकडे घातले आहे.
भुजबळ हे सभागृहातील ज्येष्ठ सदस्य असून, त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीची दखल घेऊन त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. त्यात म्हटले आहे की, भुजबळ यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली असून, कारागृह प्रशासन त्यांची काळजी घेत नाही. त्यामुळे आपण स्वत: त्यात लक्ष घालावे, अशी विनंती करण्यात आली आहे. भुजबळ यांचे महाराष्टÑाच्या जडणघडणीत योगदान आहे. त्यांच्यावरील आरोपाची गेल्या दोन वर्षांत चौकशी होऊ शकली नाही हे प्रशासनाचे अपयश आहे. न्यायालयाकडे त्यांनी वारंवार अर्ज करूनदेखील सरकारी वकिलांकडून न्यायालयात गैरहजर राहणे यासारख्या घटना घडत असून, राजकीय आकसापोटी त्यांना जामीन मिळू दिला जात नाही. त्यामुळे भुजबळ यांच्या ज्येष्ठत्वाचा विचार करून त्यांच्यावर ब्रीच कॅन्डी, हिंदुजा किंवा बॉम्बे रुग्णालयात योग्य ते उपचार होण्यासाठी आपल्या स्तरावरून आॅर्थररोड तुरुंग प्रशासनास आदेश द्यावेत, अशी विनंतीही पत्रात करण्यात आली आहे.
गेल्या २२ महिन्यांपासून छगन भुजबळ हे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असून, विशेष न्यायालयाने अलीकडेच त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी त्याविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मंगळवारी न्यायालयीन सुनावणीत भुजबळ यांना पाचारण करण्यात आल्यावर त्यांची प्रकृती खालावल्याची बाब निदर्शनास आली. त्यांना दम्याचा त्रास होत असून, दहा किलो वजन कमी झाल्याची तक्रार भुजबळ यांनी कारागृह प्रशासनाकडे केल्यावर त्यांना जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले; परंतु औषधोपचार करून पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले. त्या अनुषंगाने दीपिका चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे.