वीज थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:22 AM2018-09-25T00:22:03+5:302018-09-25T00:22:25+5:30

अधिकृत कृषिपंप ग्राहकांना सुरळीत व पुरेशा दाबाने वीजपुरवठा आणि महसुली नुकसान टाळणे, या प्रमुख उद्देशाने कृषि पंपाच्या अवैध वीज वापराविरुद्ध व थकबाकी वसूल करण्याची महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

 Special campaign for power outages recovery | वीज थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम

वीज थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम

Next

नाशिकरोड : अधिकृत कृषिपंप ग्राहकांना सुरळीत व पुरेशा दाबाने वीजपुरवठा आणि महसुली नुकसान टाळणे, या प्रमुख उद्देशाने कृषि पंपाच्या अवैध वीज वापराविरुद्ध व थकबाकी वसूल करण्याची महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सर्व वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करणे तसेच वितरण उपकेंद्रे व वाहिन्यांवरील भार त्यांच्या क्षमतेपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी महावितरणकडून उपाययोजना केल्या जातात. कृषिपंपांना दिवसा ८ तर रात्री १० तास चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला जातो. याशिवाय रोहित्र, उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांवरील भार त्यांच्या क्षमतेच्या मर्यादेत ठेवण्याची दक्षता घेण्याबाबत कक्ष व उपविभागीय कार्यालयांना आदेशित करण्यात आले आहे. तथापि रोहित्र जळणे, वीजवाहक तारा तुटणे, खंडित वीजपुरवठा, कमी दाबामुळे कृषिपंप जळणे अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्या असून संबंधित वाहिन्यांवर कृषि पंपाचा अवैध वीजवापर अधिक असल्याचे आढळून आले आहे.  या पार्श्वभूमीवर पुढील चार ते सहा आठवड्याच्या काळात कक्ष, उपविभागीय व विभागीय कार्यालयांना कृषिपंप वाहिन्यांवरील अवैध वीज वापराला प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी परिमंडळातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहे.
१३९० कोटींची थकबाकी
नाशिक जिल्ह्यात एकूण ३ लाख १८ हजार ४३५ कृषिपंप ग्राहक आहेत. त्यापैकी ३ लाख ५ हजार १३५ ग्राहकांकडे वीज बिलाची १३९० कोटी रुपयांची थकबाकी आहे. एकूण ग्राहकांपैकी जवळपास ४ टक्के कृषिपंप ग्राहक वीज बिलाचा नियमित भरणा करत असल्याचे चित्र आहे.
...तरच रोहित्र दुरुस्त करून मिळेल
कृषिपंप ग्राहकांकडील मोठ्या थकबाकीमुळे महावितरणला दैनंदिन कामकाजात अडचणी निर्माण झाल्या असून कर्जाची परतफेड करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे या ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृषिपंप वाहिनीवरील नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून देताना संबंधित रोहित्रावरील सर्व कृषी ग्राहकांनी किमान रक्कम भरणे आवश्यक राहील. २५ हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असल्यास ३ हजार तर त्यापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या कृषी ग्राहकांनी ५ हजार रुपये भरल्याशिवाय दुसरे रोहित्र बसविण्यात येणार नाही. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Web Title:  Special campaign for power outages recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.