दिवाळीत विशेष स्वच्छता मोहीम
By admin | Published: October 28, 2016 11:40 PM2016-10-28T23:40:41+5:302016-10-28T23:41:37+5:30
दिवाळीत विशेष स्वच्छता मोहीम
नाशिक : शहरात दिवाळी सणामुळे महापालिकेने दि. २९ आॅक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत सहाही विभागांत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, या मोहिमेत दिवसरात्र स्वच्छता ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाने सहाही विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहरात दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. दीपोत्सव कालावधीत शहरात स्वच्छता राखली जावी, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत असतो. फटाक्यांमुळे गल्लोगल्ली कचरा साचला जातो. शिवाय, घरोघरी साफसफाईमुळे भंगार, टाकाऊ साहित्यही रस्त्यांवर टाकून दिले जाते. त्यामुळे महापालिकेने दि. २९ आॅक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सहाही विभागांतील स्वच्छता निरीक्षक, मुकादम आणि सफाई कर्मचारी यांना दिवसरात्र स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेशित करण्यात आले आहे. मोहिमेसाठी विभागनिहाय प्रत्येकी पाच घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या स्वच्छता मोहिमेत रस्त्यांवर कुठेही कचरा दिसणार नाही अथवा कुठेही कचरा साचणार नाही याबाबत विशेष दक्षता घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)