दारू पार्टीप्रकरणी संशयितांना पोलीस कोठडीची मागणी : विशेष मोक्का न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 10:49 PM2017-08-01T22:49:37+5:302017-08-01T22:51:58+5:30
प्रचाराच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी पांगरमल येथे रंगविलेल्या ओल्या पार्टीत विषारी दारू प्राशन केल्यामुळे नऊ मद्यपींचा आठवडाभरात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील सर्व संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र मंगळवारी (दि.१) नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात दाखल करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अहमदनगरमधील पांगरमल येथे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये पार पडल्या. यावेळी प्रचाराच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी पांगरमल येथे रंगविलेल्या ओल्या पार्टीत विषारी दारू प्राशन केल्यामुळे नऊ मद्यपींचा आठवडाभरात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील सर्व संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र मंगळवारी (दि.१) नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान सर्व संशयित आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्याचे आदेश गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहे.
पांगरमल येथे झालेल्या ओल्या पार्टीत विषारी दारू प्राशन केल्याने नऊ लोक मृत्युमुखी, तर तेरा जणांना विषबाधा झाली होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत गुन्ह्यात सहभागी असणाºया वीस संशयितांना अटक केली होती. यामध्ये निवडून आलेल्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री मोकाटे, मंगला आव्हाड माजी पंचायत समिती सभापती गोविंद मोकाटे यांच्यासह तब्बल २० संशयितांचा सहभाग आहे. भाग्यश्री मोकाटे घटनेपासून फरार असून, गोविंद व मंगला यांना जामीन मंजूर झाला आहे. सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले असून, अहमदगर येथील कारागृहातून सर्व संशयितांना पोलिसांनी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात हलविले आहे. भाग्यश्री मोकाटे अद्याप फरार असून, गुन्हे अन्वेषण विभागापुढे त्यांना अटक करण्याचे आव्हान आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद करत पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सर्व संशयितांना मिळावी, अशी मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सर्व संशयितांना बुधवारी न्यायालयापुढे हजर करण्याचे आदेश दिले असून, यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.