जिल्ह्याच्या सीमेवर विशेष पोलीस पेट्रोलिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 01:29 AM2019-03-17T01:29:14+5:302019-03-17T01:29:33+5:30
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ग्रामीण पोलीस दल सक्षमपणे कार्यरत असणार आहे. - डॉ. आरती सिंह
अझहर शेख । लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. या भागातील गावठी दारूच्या हातभट्ट्यांपासून सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
प्रश्न : जिल्ह्याच्या गुन्हेगारीवर कशाप्रकारे अंकुश ठेवणार?
उत्तर : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून अवैध मार्गाने बेकायदेशीर मद्याची वाहतूक जिल्ह्यात होते. जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी तसेच सीमावर्ती भागावरील तटबंदी अधिक मजबूत करण्यासाठी विशेष गस्त पथक नियुक्त केले जाणार आहे. ग्रामीण पोलीस दलात काहीशी आलेली मरगळ सर्वप्रथम दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.
प्रश्न : जिल्ह्याचा बहुतांश भाग आदिवासीबहुल असल्यामुळे आपण कशा स्वरूपाचा आराखडा बांधला आहे?
उत्तर : यापूर्वीदेखील आदिवासी भागात सेवेचा अनुभव पाठीशी आहे. तसेच गडचिरोली, भंडारा यांसारख्या जिल्ह्यांमध्येही कर्तव्य बजावले असल्यामुळे त्या अनुभवाचा उपयोग नक्कीच होत असतो. जिल्ह्याच्या आदिवासी भागाची व्याप्ती मोठी असून, त्या भागात निरक्षरतेचे प्रमाणही अधिक आहे. यामुळे जनजागृती आणि प्रबोधनाच्या माध्यमातून कायदासुव्यवस्था अधिकाधिक बळकट करण्याचा प्रयत्न राहणार आहे. आदिवासी भागात होणाऱ्या गावठी दारूनिर्मितीच्या अवैध व्यवसायासह अन्य प्रकारच्या गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
प्रश्न : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कशावर भर देण्याची गरज वाटते?
उत्तर : जिल्ह्यात अन्य राज्यांच्या सीमेवरून अवैधमार्गे मद्यसाठा, शस्त्रांची वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला लागून असलेल्या गुजरात,
मध्य प्रदेश राज्यांच्या सीमांवर
विशेष लक्ष ग्रामीण पोलीस व
ग्रामीण स्थानिक गुन्हे शोध पथकाचे राहणार आहे. त्यादृष्टीने विविध सूचना देण्यात आल्या असून, जिल्ह्यातील गावपातळीवरील गावठी दारूअड्डे
शोधून उद्ध्वस्त केले जातील.
अवैध दारूविक्री संपुष्टात आणल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असा विश्वास वाटतो.
संवाद, समन्वय सुधारणार
जिल्ह्यातील तालुका स्तरावरील विविध पोलीस ठाणे आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये संवाद अन् समन्वय राखला जाणार आहे. सर्वच पोलीस ठाणे प्रमुखांशी वेळोवेळी बैठका घेऊन संवाद साधत गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना आखल्या जातील.
अवैध धंद्यांचा बीमोड करू
अवैध धंदे उद्ध्वस्त करून गुन्हेगारीचा बीमोड करणार आहे. आदिवासी बहुल भागात काही माफि यांनी स्थानिक नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत अवैध व्यवसाय सुरू केले आहेत; मात्र ते आता टिकू शकणार नाहीत.
दामिनी पथक सक्रिय करणार
ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष पुरविले जाणार आहे. या भागातील शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘दामिनी’ पथक भेट देऊन विद्यार्थिनींचे प्रबोधन करणार आहे. कुठल्याही प्रकारे गैरवर्तन झाल्यास तत्काळ माहिती कळविण्याबाबतचा प्रचार-प्रसार महिला पोलिसांच्या पथकाद्वारे केला जाणार आहे.