‘कालत्रयी कुमार गंधर्व’चे अभिवाचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:50 AM2018-04-03T00:50:25+5:302018-04-03T00:50:25+5:30
आयाम नाशिक आयोजित व ग्रंथ तुमच्या दारी प्रस्तुत अक्षरबाग वाचन कट्टा या जयेश आपटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रमाचे आयोजन ऋतुरंग भवनमध्ये आयोजित करण्यात आले होते.
नाशिकरोड : आयाम नाशिक आयोजित व ग्रंथ तुमच्या दारी प्रस्तुत अक्षरबाग वाचन कट्टा या जयेश आपटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रमाचे आयोजन ऋतुरंग भवनमध्ये आयोजित करण्यात आले होते. कुमार गंधर्वांच्या जीवनावर आधारित ‘कालत्रयी कुमार गंधर्व’ या पुस्तकाचे अभिवाचन करण्यात आले. यातील संवाद वाचन चिन्मय खेडेकर यांनी केले, तर कुमार गंधर्वांच्या विविध रागदारीतील रचना प्रीतम नाकील यांनी सादर केल्या. अभिवाचनात श्रोते तल्लीन होऊन एकेका संवादाला व रचनेला दाद देत होते. ‘अवधुता गगन घटा... रूम झुम बरसे नेहारे’ ही रचना दाद घेऊन गेली. कुमार गंधर्वांचे संगीत क्षेत्रातील योगदान मोठे आहेच. याचा प्रत्यय या कार्यक्रमातून आला. जयेश आपटे यांनी प्रास्ताविक केले. ऋतुरंग परिवाराचे सदस्य व कलाकारांचा सत्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत टकले यांनी केला. आभार विनायक रानडे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. डॉ. राम कुलकर्णी, डॉ. राजीव पाठक, आर्किटेक्ट संजय पाटील, प्रकाश पाटील, संतोष जोशी, गिरीश वागळे, तन्वी अमित, भागवत माळी आदिंसह उपस्थित होते. कुमार गंधर्वांबद्दल त्यांचे समकालीन व कवी, साहित्यिक यांनी सांगितलेले काही किस्से व रचना पेश करण्यात आल्या. मंगेश पाडगांवकर आपल्या कवितेतून कुमार गंधर्वांबद्दल म्हणतात ‘झाडे गदागदा हलवणारा वनघोर पाऊस, थेंबाचा अपार उत्सव मनस्वी पानापानातून फांद्यांच्या हिरव्या जत्रेत गरगणारे बिलोरी पाळणे आत्मा पिसाऱ्यातून फुलवणारा मुक्त मनमोर पाऊस’ असे वर्णन करतात. तसेच अवलिया पाऊस, गोरखनाथाच्या हाकेसारखा अलखनिरंजन पाऊस हाक ऐकुन नकळत उठुन चालु लागतो आपण दुर्लघ्य पहाडापल्याडच्या निर्विकल्पात असा पाऊस असेही पाडगांवकर म्हणतात. हे सुरू असतांनाच संवादिनीचा मधुर सूर आणि कुमार गंधर्वांची रचना सादर करून प्रीतम नाकील यांनी टाळ्या मिळविल्या.