भूमिपुत्रांच्या शब्दगंधाचा दरवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 01:16 AM2018-03-03T01:16:26+5:302018-03-03T01:16:26+5:30
माता आणि माती, आजोबा आणि नात यांच्यातील नात्यांचा उलगडा करणाºया, निसर्गाच्या सुंदरतेची प्रचिती देणाºया कवितांची सायंकाळ नाशिककरांनी शुक्रवारी (दि. २) अनुभवली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या गावातीलच भूमिपुत्रांच्या शब्दगंधाचा हा दरवळ मैफलीनंतरही नाशिककरांच्या मनात घोळत राहिला.
नाशिक : माता आणि माती, आजोबा आणि नात यांच्यातील नात्यांचा उलगडा करणाºया, निसर्गाच्या सुंदरतेची प्रचिती देणाºया कवितांची सायंकाळ नाशिककरांनी शुक्रवारी (दि. २) अनुभवली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या गावातीलच भूमिपुत्रांच्या शब्दगंधाचा हा दरवळ मैफलीनंतरही नाशिककरांच्या मनात घोळत राहिला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ‘कुसुमाग्रज स्मरण’ अंतर्गत स्थानिक भूमिपुत्र असलेल्या कवींचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कवी किशोर पाठक, खलील मोमीन, लक्ष्मण महाडिक, रेखा भांडारे, गंगाधर अहिरे, तुकाराम धांडे हे सहभागी झाले होते. मैफलीची सुरुवात तुकाराम धांडे यांनी केली आणि ‘आई होती तेव्हा, जातं गाणं गायचं, उखळामध्ये नाचताना उड्या मारायचं’ ही माती आणि मातेचे नाते विशद करणारी कविता सादर केली. या कवितेला उत्स्फूर्त दाद मिळाली आणि ‘वन्स मोअर’ घेत धांडे यांनी पुन्हा एकदा कविता ऐकविली. त्यानंतर लक्ष्मण महाडिक यांनीही आजी आणि नातीचा संवाद साधणारी कविता सादर केली. ‘पहिला पाऊस झेलशील जेव्हा, चिंब पावसात भिजून घे’ या कवितेला उपस्थितांकडून दाद मिळाली. रेखा भांडारे यांनी ‘शल्य’ ही कविता सादर करताना सिग्नलवर गजरे विकणाºया चिमुरड्यांच्या वेदनांना हात घातला. ‘गिधाडे’ या कवितेतून ‘आतले ते माणसांचे, रंग होते वेगळे, सभ्यतेच्या आड त्यांचे, रूप ते झाकले’ असे सांगत माणसातल्या विकृतींवरही त्यांनी प्रहार केले. गंगाधर अहिरे यांनी ‘कळप’ या कवितेतून समाजातील भीषण वास्तव मांडले. ‘आला कळप कळप, त्याने घातली झडप, जीव कोवळा कोवळा, रक्ताळलेला सरे आम’ या काव्यपंक्तीने उपस्थितांना आत्मचिंतन करायला भाग पाडले. अहिरे यांनी राजकारणी आणि चोर यातील साम्यता दर्शविणारी कविता सादर करत मैफलीचा माहोल हलका-फुलका केला. खलील मोमीन यांनी ‘अनुनय’ आणि ‘पुनर्विवाह’ या कविता सादर करत दाद मिळविली. मैफलीचे निवेदन किशोर पाठक यांनी केले. प्रारंभी प्रतिष्ठानचे विलास लोणारी आणि अरविंद ओढेकर यांनी कवींचे स्वागत केले.
रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कुसुमाग्रज स्मरण उपक्रमांतर्गत स्थानिक कवींच्या मैफलीला नाशिककर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इगतपुरीचे कवी तुकाराम धांडे यांनी सादर केलेल्या पहिल्याच कवितेला ‘वन्स मोअर’ मिळाला आणि धांडे यांनीही रसिकांची निराशा न करता पुन्हा एकदा कविता ऐकविली.