नाशिक- पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणास वेग
By admin | Published: October 17, 2014 11:56 PM2014-10-17T23:56:34+5:302014-10-18T00:04:51+5:30
अडथळ्यांची शर्यत : गोंदे फाटा ते संगमनेर दरम्यान काम
सिन्नर : नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० च्या चौपदरीकरणाच्या कामास तालुक्यात वेग आला आहे. तालुक्यातील गोंदाफाट्यापासून संगमनेरकडे काम सुरु असल्याने वाहनचालकांची लवकरच अडथळ्यांच्या शर्यतीतून सुटका होणार आहे.
या महामार्गाचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरु करण्यात आले आहे. मात्र मध्यंतरी झालेल्या उशिराच्या पावसाने रस्त्यांच्या कामात काही प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. तथापि, आता पावसाने पूर्णत: उघडीप दिल्याने रस्त्याच्या कामाला वेग आल्याचे चित्र आहे. या रस्त्यावरील पूल, भूयारीमार्ग व नांदूरशिंगोटेजवळील बाह्यवळण रस्ता व महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरदारपणे सुरु असल्याचे चित्र आहे.एका खासगी कंपनीने या कामाचा ठेका घेतला आहे.
रस्ता एका बाजूने सुरू असून, दुसऱ्या बाजूने रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. रस्त्यावरील पुलांचे बांधकाम जोरात सुरू असून, दोडी बुद्रूक येथे उड्डान पुलाच्या कामासही महिनाभरापासून सुरुवात झाली आहे. मात्र दोडी येथील अतिक्रमणे अद्याप हटविण्यात आली नाही. थोड्याच दिवसांत ही अतिक्रमणे काढली जाणार असल्याची चर्चा दोडी येथे सुरू झाली आहे. या कामासाठी काढण्यात ेयेणाऱ्या अतिक्रमित बांधकामांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष अतिक्रमण मोहीम हाती घेतल्यावर अनेकजण स्वत:च हे बांधकामे हटवतील असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असल्याने पुढील कामास प्रारंभ करण्यात आला आहे. (वार्ताहर)