त्र्यंबकेश्वर तालुक्यात भात आवणीस वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:45 PM2020-07-08T17:45:38+5:302020-07-08T17:45:56+5:30
मजुरीत वाढ : शहराला दिवसाआड पाणीपुरवठा
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात भात आवणीच्या कामांना वेग आला असून मजुरांना देण्यात येणाऱ्या मजुरीतही वाढ झालेली आहे.
भात आवणीसाठी यापूर्वी दर दिवशी दर माणसी २५० रुपये मजुरी दिली जात होती. आता ही मजुरी ३०० ते ३५० रूपयांवर जाऊन पोहोचली आहे. ज्यांची भात पेरणी लवकर झाली आहे. अशा ठिकाणी भात आवणीला वेग आला आहे. तर काहींची अद्याप पेरणी सुरु आहे. आतापर्यंत त्र्यंबकेश्वर शहरात ३२७ मि.मी. पाऊस पडला असुन मंगळवारी (दि.७) रोजी ४० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची सरासरी २२५० मि.मी. असुन तालुक्यात तीन ठिकाणी पावसाची सरासरी मोजली जाते. हरसुलमध्ये आतापर्यंत ४८१ मि.मी., वेळुंजे येथे ४२२ मि.मी तर त्र्यंबकेश्वर येथे ३२७ मि.मी. अशा नोंदी झाल्या आहेत. आतापर्यंत २८ टक्के पेरणी झाली आहे. आता आर्द्रा संपून पुनर्वसु नक्षत्र सुरु झाले आहे. या नक्षत्रात फारसा पाऊस नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्र्यंबकेश्वर शहराला अंबोली व गौतमी गोदावरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत अंबोलीत ४० टक्के तर गौतमी बेझे मध्ये १८ टक्के पाणीसाठा असल्याने अजुनही शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.