मानोरी, देशमाने परिसरात पेरण्यांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 08:58 PM2020-06-16T20:58:49+5:302020-06-17T00:16:57+5:30
देशमाने : गाव, परिसरात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने खरीप पेरण्यांना वेग आला आहे, मात्र निम्म्याहून अधिक शिवारात अत्यल्प पावसामुळे पेरणीयोग्य ओल नसल्याने त्या ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत.
देशमाने : गाव, परिसरात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने खरीप पेरण्यांना वेग आला आहे, मात्र निम्म्याहून अधिक शिवारात अत्यल्प पावसामुळे पेरणीयोग्य ओल नसल्याने त्या ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत.
गावच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या भागात खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी आदी पिकांच्या पेरणीस वेग आला आहे. गावाकडील पूर्व भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने अद्याप पेरणीयोग्य ओलच नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी थांबविली आहे.
तुरळक शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या अपेक्षेने पेरण्या केल्या. आगामी दोन-तीन दिवसांत पुरेसा पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट या शेतकºयांपुढे उभे राहिले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सभोवताल समाधानकारक पाऊस होत असून, या भागातच पाऊस हुलकावणी देत आहे. दरम्यान, देशमाने शिवारातील खडकी नाला ते जळगाव नेऊर शिवारातील वनारसी नाला यादरम्यान नेहमीच पावसाचे प्रमाण कमी असल्याचे या परिसरातील शेतकºयांचे म्हणणे आहे.
-----------------------------------
मानोरी बुद्रुक परिसरात मृग नक्षत्रात शनिवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील मका, सोयाबीन पेरण्यांना सोमवारी वेग आला असून, शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या धास्तीने शेतकरी वर्गाने पाऊस पडल्यानंतर शेतकामांच्या मशागतीला सुरुवात केली होती.
लॉकडाऊनच्या परिस्थितीत काही शेतकºयांनी समूह पद्धतीने बियाणे आणि खते आपल्या बांधावर पेरणीसाठी खरेदी केले असल्याचे दिसून आले आहे. पारंपरिक पद्धतीने यंदाही काही ठिकाणी शेतकरी बैलजोडीच्या पेरणीला प्रामुख्याने प्राधान्य देत आहे. शेतीची जास्त तुडवातुडव होऊ नये यासाठी बैलजोडीचा वापर शेतकरी करीत आहेत.
---------------------
कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असल्याने यंदा मजुरांची मोठी वानवा भासत असल्याचे दिसून येत आहे. सध्या मानोरी परिसरात छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करण्यास शेतकरी पसंती देत आहेत.