ढगाळ वातावरणामुळे फवारणीच्या कामाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:30 AM2020-12-14T04:30:33+5:302020-12-14T04:30:33+5:30
नाशिक : शनिवारपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे तसेच अवकाळी पावसामुळे द्राक्षासह अन्य पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता ...
नाशिक : शनिवारपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे तसेच अवकाळी पावसामुळे द्राक्षासह अन्य पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी रविवारपासूनच औषध फवारणीच्या कामाला वेग दिला. ढगाळ वातावरणासह थंडीचा कडाका कायम राहिल्यास पुन्हा एकदा शेतकऱी पेचात सापडण्याची शक्यता आहे.
नाशिक शहरासह परिघात अवकाळी पावसासह गारठा वाढला आहे. जिल्ह्यात द्राक्षासह, कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे; मात्र सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. या हवामानामुळे द्राक्षासह कांद्यावरही रोगराईचे संकट निर्माण झाले आहे. विशेषत्वे भुरी, डावनी, मावा या रोगांचे संकट पिकांवर आल्याने पिकांना वाचविण्यासाठी शेतक-यांनी विविध महागड्या औषधांची फवारणी सुरू केली आहे. महानगरासह जिल्ह्यातील विविध भागात अनेक ठिकाणी शेतकरी महागडी औषधे फवारणी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे एकीकडे पिकांवरील खर्च वाढण्याची शक्यता तर दुसरीकडे पिके हातातून जाण्याची भीती असे संकट निर्माण झाले आहे. येत्या आठवड्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला तरी द्राक्षपिकाच्या संकटात भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे निदान येत्या आठवड्यात तरी वातावरणातील मळभ दूर होण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.