पुनंद पाणी योजनेच्या कामाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:55 AM2019-06-30T00:55:14+5:302019-06-30T00:55:33+5:30
न्यायालयाच्या आदेशानुसार पुनंद पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर या कामास गती देण्यात आली असून, संबंधित ठेकेदाराला नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी तंबी दिल्याने शनिवारी (दि.२९) यंत्रसामग्री तीन ते चार पटीने वाढविण्यात आली.
सटाणा : न्यायालयाच्या आदेशानुसार पुनंद पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर या कामास गती देण्यात आली असून, संबंधित ठेकेदाराला नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी तंबी दिल्याने शनिवारी (दि.२९) यंत्रसामग्री तीन ते चार पटीने वाढविण्यात आली.
पुनंद पाणी योजनेबाबत गुरु वारी (दि. २७) सायंकाळी उशिरा न्यायालयाचा आदेश पोहोचल्याने तत्काळ दुसºया दिवशी शुक्रवारी (दि. २८) काम सुरू करताना प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली होती. प्रशासकीय पूर्वतयारीला पुरेसा वेळ मिळाला नाही. तरीही जिल्हाधिकारी व पोलीस पोलीस उपअधीक्षक यांनी तातडीने नियोजन करून कामाला सुरुवात केली होती. पोलीस बंदोबस्तात इन कॅमेरा पद्धतीने पहिल्या दिवशी जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेचे सपाटीकरण व पाइपलाइनचे काम सुरू करण्यात आले. संबंधित कामासाठी मोजकीच यंत्रणा असल्याने कामाच्या गती बाबत असमाधान व्यक्त करीत नगराध्यक्ष सुनील मोरे व मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी संबंधित ठेकेदाराला धारेवर धरले होते व तंबी देत वेगाने काम होण्यासाठी यंत्रसामग्री वाढविण्याची सूचना केली होती. त्यानुसार शनिवारी (दि.२९) सात जेसीबी व पाच पोकलॅण्डच्या साहाय्याने कामाला सुरु वात करण्यात आली. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, अधिकारी व नगरसेवक दिवसभर कामाच्या ठिकाणी तळ ठोकून होते. कामाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त दुसºया दिवशीही कायम ठेवण्यात आला होता. शनिवारी कामास कुठल्याही स्वरूपाचा विरोध झाला नाही.
जलशुद्धीकरण केंद्राची पायाभरणी
पाणीपुरवठा योजनेसाठी जलशुद्धीकरण केंद्राच्या कामालादेखील प्रारंभ करण्यात आला आहे. शासनाने जलशुद्धीकरण केंद्रासाठी ६९ गुंठे जमीन खरेदी करून दिली आहे. या जागेवर अद्ययावत जलशुद्धीकरण केंद्र उभारणीसाठी स्वतंत्र निधी मंजूर केला आहे. शनिवारी (दि.२९) त्याची पायाभरणी करून कामाला सुरु वात करण्यात आली.