विभाजनाची टांगती तलवार
By Admin | Published: February 10, 2016 11:34 PM2016-02-10T23:34:55+5:302016-02-10T23:39:07+5:30
राज्य सरकार आणखी एक पाऊल पुढे : समिती गठीत; नाशिककरांचा विरोध निष्प्रभ
नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करून नागपूरला स्वतंत्र आयुष विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. नियोजित विद्यापीठाच्या पुढच्या कार्यवाहीसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तांत्रिक समिती गठित केली असून, या बैठकीत आयुर्वेदाच्या अनेक शाखांची स्वतंत्र विद्यापीठासाठी अनुकूलता दर्शविल्याचे समजते. या निर्णयामुळे मंत्रिमहोदयांनी नाशिककरांचा विरोध दुर्लक्षित केल्याचेच दिसून येते.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करण्यासाठी आयुष विभागाने स्थापन केलेल्या समितीने ७० एकर जागेची उपलब्धता करून दिल्यानंतर आता विद्यापीठ आकारास येण्यासाठी कोणत्या तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागेल यासाठीची दुसरी समिती तावडे यांनी नियुक्त केली आहे. वास्तविक नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाचे विभाजन करून आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानीचे स्वतंत्र विद्यापीठ केल्यास नाशिककर रस्त्यावर उतरतील अशी भूमिका नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी घेतली होती. अनेक राजकीय नेत्यांनी तर यासाठी प्रसंगी आंदोलनाचीदेखील तयारी बोलून दाखविली होती.
विशेष म्हणजे होमिओपॅथी आणि युनानी महाविद्यालयांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आरोग्य विद्यापीठाचे विभाजन करू नये अशी विनंती करीत आरोग्य विद्यापीठासोबतच संलग्न ठेवण्यात यावे असे म्हटले होते. त्यामुळे आरोग्य विद्यापीठाला मोठा दिलासा मिळाला होता. लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांनीदेखील समर्थनाचे पत्र दिल्याने शासन नाशिकरांच्या भावनांचा आदर करून फेरविचार करेले असे वाटत असताना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करीत आयुष विद्यापीठ स्थापनेबाबतचे एक पाऊल पुढे टाकले आहे.
आमदार देवयानी फरांदे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर तर मुख्यमंत्र्यांनी आपणाला याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगून स्वतंत्र आयुष विद्यापीठ किंवा आरोग्य विद्यापीठाचे विभाजन करण्याचे विचाराधीन नसल्याचे फरांदे यांना सांगितले होते. असे असतानाही तावडे यांनी आयुर्वेदाच्या विविध संस्था आणि संघटनांशी चर्चा करून विभाजन होणार असल्याचेच संकेत दिले आहेत. (प्रतिनिधी)