मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला उपनगरांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:42 AM2018-07-26T00:42:15+5:302018-07-26T00:42:35+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला सिडको व अंबड भागात बहुतांशी व्यावसायिकांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली, तर काही भागात सुरू असलेल्या दुकानदारांना मराठा समाजबांधवांनी फिरून शांततेत बंदचे आवाहन केल्याने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र बघावयास मिळाले.
सिडको : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला सिडको व अंबड भागात बहुतांशी व्यावसायिकांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली, तर काही भागात सुरू असलेल्या दुकानदारांना मराठा समाजबांधवांनी फिरून शांततेत बंदचे आवाहन केल्याने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र बघावयास मिळाले. सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी राणेनगर येथून फेरीला सुरुवात करण्यात आली. यानंतर फेरी स्वामी विवेकानंदनगर, उत्तमनगर, पवननगर, अंबड लिंक रोडमार्गे शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून सुरू असलेल्या दुकानदार व व्यवसायिकांना बंदचे आवाहन करण्यात आले. नंतर त्रिमूर्ती चौक येथे फेरीचा समारोप करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वैभव देवरे, आशिष हिरे, योगेश गांगुर्डे, विजय पाटील, गणेश अरिंगळे, राजू कदम, मुकेश शेवाळे, अभय पवार, योगेश आहिरे, नाना ठोंबरे, शुभम महाले, समीर सुर्वे, संजय देशमुख, वैभव कोल्हे आदी सहभागी झाले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या पन्नासहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले. अंबड गावातून सकल मराठा समाजाच्या वतीने फेरी काढण्यात आली. यानंतर ही फेरी अंबड गाव, एक्सलो पॉइंट, गरवारे पॉइंट मार्गे पाथर्डी फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात शहीद झालेल्यांना सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली. तर सकल मराठा समाजाच्या काही बांधवांनी उत्तमनगर, उपेंद्रनगर, सहावी योजना या भागातदेखील दुकानदार व व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला. सामाजिक कार्यकर्ते संजय भामरे, विनोद सोनवणे, शशी गरुड, कैलास खांडगे, इकबाल शेख, महेश चव्हाण, सचिन अहिरे, प्रमोद गवळी, राहुल कातोरे, सागर विसे यांनी दुकानदारांना बंदचे आवाहन केले. सिडकोतील मुख्य चौक तसेच गर्दीचे ठिकाण व बस व रिक्षा थांबे येथे बंदमुळे गर्दी तशी कमीच दिसून आली. सिडको व अंबड भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पंचवटी परिसरात संमिश्र प्रतिसाद
मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच विविध मागण्यांसाठी मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (दि.२५) पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला पंचवटी परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. वर्दळ असलेल्या परिसरातील दुकाने बंद तर गावठाण परिसरात दैनंदिन व्यवहार पूर्णपणे सुरळीत चालू होते.
पंचवटी परिसरात कोणतेही हिंसक वळण लागले नाही. शांततेच्या मार्गाने मराठा समाजबांधवांनी आंदोलन केले. पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, जुना आडगाव नाका, यांसह अन्य परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेली दुकाने बंद होती तर गावठाण भाग असलेल्या ठिकाणी सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. परिसरातील अनेक ठिकाणच्या मुख्य चौकाचौकात सकाळपासूनच पोलीस बळ तैनात करण्यात आले होते.
सकाळी पावणे अकरा वाजता मराठा क्र ांती मूक मोर्चाच्या वतीने पंचवटी कारंजा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मालेगाव स्टॅन्ड, रविवार कारंजा, रेडक्र ॉस, शालिमार आदी भागातून पायी फेरी काढण्यात येऊन दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते. यावेळी काही आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. शालिमार येथून पायी मोर्चा पुन्हा पंचवटी कारंजा येथे परतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी हमारी मांगे पुरी करो, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. यावेळी माजी आमदार जयंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नितीन डांगे, सचिन पवार, राजू, देसले, बाळासाहेब उगले, चेतन शेलार, माधवी पाटील, पूजा ढमाल आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.