नाशिककरांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 01:27 AM2021-03-15T01:27:06+5:302021-03-15T01:28:27+5:30
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवार आणि रविवार बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला नाशिककरांनी स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिला. सलग दोन दिवस बाजारपेठांमधील रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. बंद काळात नागरिकांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवले.
नाशिक : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवार आणि रविवार बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला नाशिककरांनी स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिला. सलग दोन दिवस बाजारपेठांमधील रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. बंद काळात नागरिकांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवले.
गर्दीमुळे फैलावणारा कोरोना नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नागरिकांनी देखील समजूतदारपणाची भूमिका निभावली. लॉकडाऊन नकोच अशीच नाशिक- करांची मानसिकता असल्याचे प्रतिसादावरून दिसून आले.
जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर
रविवारी सुटी असतानाही जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी रस्त्यावर उतरुन बंदची पाहणी केली. तर शनिवारी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. तसेच शहरातील बंदची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रशासनातील दोन वरिष्ठ अधिकारी बंदच्या अंमलबजावणी-साठी थेट रस्त्यावर उतरल्याने आता निर्बंधाच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आलेले अधिकारी कार्यप्रवृत्त झाले आहेत.
मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई
मास्क न वापरणाऱ्यावर अपेक्षेप्रमाणे कारवाई होत नसल्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी स्वच्छता निरीक्षकांना कारवाईचे आदेश दिले आहेत. कारवाई कमी झाल्यामुळे आयुक्त कैलास जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे स्वच्छता निरीक्षक यांनी कारवाई करावी, या संदर्भातील कारवाईत कसूर केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देखील डॉ. कल्पना कुटे यांनी दिला आहे.