गोंदे दुमाल्यातील स्पोर्ट कार निघाली अमेरिकेला
By Admin | Published: June 3, 2016 11:56 PM2016-06-03T23:56:18+5:302016-06-03T23:59:08+5:30
गोंदे दुमाल्यातील स्पोर्ट कार निघाली अमेरिकेला
बेलगाव कुऱ्हे : मनात जिद्द व आत्मविश्वास असेल तर कोणतेही कार्य अपार मेहनतीच्या बळावर पूर्ण होते, हे सिद्ध करून दाखवलंय गोंदे दुमाला (ता. इगतपुरी) येथील निशांत हरिचंद्र जाधव या २३ वर्षीय विद्यार्थ्याने.
निशांतने आपल्या मित्रांच्या मदतीने संशोधन करून स्पोर्ट कार तयार केली असून, अमेरिकेतील स्पर्धेसाठी या कारची निवड झाली आहे. निशांत याने पुणे येथे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना आपल्या मित्रांच्या मदतीने संशोधन करून हॅवाक ६.० स्पोर्ट कार तयार केली आहे.
देशांतर्गत विविध स्पर्धांमध्ये निशांतच्या टीमने भाग घेऊन त्यात या स्पोर्ट कारने यश मिळवले आहे. त्यांच्या या कारची निवड अमेरिकेत होणाऱ्या बॅज एसएई इंटरनॅशनल रोचेस्टर २०१६ स्पर्धेसाठी झाली आहे. निशांत आणि त्याची टीम अमेरिकेतील स्पर्धेसाठी रवाना झाली आहे. ९ जून रोजी ही स्पर्धा होणार असून, पूर्वतयारीसाठी आठ दिवस आधिच निशांतची टीम अमेरिकेत पोहचणार आहे.
या स्पर्धेसाठी निशांत आणि त्याच्या टीमला सुमारे पन्नास लाख रु पये खर्च आला आहे. या स्पर्धेसाठी कॉलेजकडून अर्धा खर्च केला जाणार असून, अर्धा स्वत: पालकांनी केला आहे. सतत प्रोत्साहन देऊन खंबीरपणे निशांतच्या पाठीशी राहणारे हरिभाऊ जाधव आणि त्यांच्या परिवाराचे परिसरातून कौतुक होत आहे. त्याने दीड वर्षाच्या कालावधीत अथक परिश्रमातून बनवलेली स्पोर्ट कार खरोखरच उल्लेखनीय आहे.
गोंदे दुमाला येथील जिल्हा परिषद शाळेत शिकलेला एक मुलगा आज संशोधन करून अमेरिकेत यशाचा झेंडा रोवण्यासाठी निघाला आहे. गोंदे दुमाला गावाचे नाव सातासमुद्रापार नेणाऱ्या निशांतचा सर्व गोंदे गावाला अभिमान वाटतो आहे.
निशांत अमेरिकेतही यशस्वी व्हावा हीच सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे.