एसएमआरके महाविद्यालयात रंगणार एसएनडीटी विद्यापीठाचा क्रीडा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 06:46 PM2019-09-14T18:46:11+5:302019-09-14T18:52:50+5:30
नाशकातील एसएमआरके महिला महाविद्यालयात यावर्षी १७ ते १९ सप्टेंबर या कालावधीत एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन क्रीडा महोत्सव रंगणार आहे. या क्रीडा महोत्सवात बेसबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, ज्युडो, तायक्वांदो आदी क्रीडा प्रकारांबरोबर प्रश्नमंजूषा स्पर्धाही होणार आहे.
नाशिक : एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन क्रीडा महोत्सव यावर्षी नाशकातील एसएमआरके महिलामहाविद्यालयात १७ ते १९ सप्टेंबर या कालावधीत रंगणार असून, या क्रीडा महोत्सवात बेसबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, ज्युडो, तायक्वांदो आदी क्रीडा प्रकारांबरोबर प्रश्नमंजूषा स्पर्धाही होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे यांनी शनिवारी (दि.१४) पत्रकार परिषदेत दिली.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी (दि.१७) दुपारी ३.५० वाजता संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्या अध्यक्षतेत क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी एसएनडीटी विद्यापीठाचे उपक्रीडा संचालक डॉ. नितीन प्रभू तेंडुलकर, नाशिक तालुका क्रीडाधिकारी पल्लवी धात्रक, डॉ. महेंद्र महाजन, डॉ. लिंडा डेनिस उपस्थित राहणार आहेत. संस्थेच्या क्रीडा मैदानावर व इनडोअर कोर्टवर या स्पर्धा रंगणार असून, ज्युडो व तायक्वांदो स्पर्धा शिवाजी स्टेडियमवर होतील. एसएनडीटी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या देशभरातील विविध महाविद्यालयांतील जवळपास ३८७ विद्यार्थिनी क्रीडा महोत्सवांतर्गत होणाºया विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपप्राचार्य डॉ. कविता पाटील, डॉ. नीलम बोकिल, डॉ. कविता खोलगडे, प्रा. गंगाधर अहिरे, प्रा. छाया लोखंडे आदी उपस्थित होते. दरम्यान, गुरुवारी (दि.१९) रोजी महाविद्यालयाच्या पाटणकर सभागृहात संस्थेचे सहखजिनदार प्रा. बी. देवराज यांच्या अध्यक्षतेत धावपटू मोनिका आथरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळ्याने क्रीडा महोत्सवाचा समारोप होणार आहे.