रस्त्यांवर फिरणाऱ्यांची जागेवरच अँटिजेन तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:14 AM2021-04-17T04:14:38+5:302021-04-17T04:14:38+5:30
नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आरोग्य नियमांचे पालन केले जात नाही हे त्यातील मुख्य कारण असले तरी बाधित ...
नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आरोग्य नियमांचे पालन केले जात नाही हे त्यातील मुख्य कारण असले तरी बाधित होऊनही लक्षणे नसलेले परंतु इतरांमध्ये या संसर्गाचा फैलाव करणाऱ्यांचा मुक्त संचार सर्वाधिक अडचणीचा ठरला आहे. त्यामुळे महापालिकेने गेल्या फेब्रुवारी-मार्च महिन्यातच नागरिकांशी थेट संबंध येणाऱ्या महापालिका आणि बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांपासून रिक्षाचालक, भाजी विक्रेते, किराणा दुकानदार अशी सर्वांचीच अँटिजेन चाचणी करून सुपरस्प्रेडर्स शोधण्याचा प्रयत्न केला होता. शहरातील पंचवटी कारंजा, सिडकोसह अनेक ठिकाणी महापालिकेने आणि पाेलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांना थेट महापालिका रुग्णालयात नेऊन कोरोना चाचण्या केल्या होत्या. त्यात अनेक सुपर स्प्रेडर्सचा शोध घेण्यात महापालिकेला यश आले होते.
दरम्यान, आता आयुक्त कैलास जाधव यांनी शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सुपर स्प्रेडर्सची शोधमोहीम गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आता पूर्वीच्या कार्यपद्धतीत बदल केला आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांना एका वाहनात बसवून रुग्णालयापर्यंत नेण्याऐवजी आता महापालिकेच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि एक शिक्षक यांचे पथक तयार केले असून ते पोलिसांच्या बरोबर असेल. रस्त्यावर फिरणारे नागरिक आढळले की त्यांना तेथेच अडवून त्यांची अँटिजेन चाचणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ करतील तर संंबंधित नागरिकाची माहिती शिक्षक गुगलशीट आणि पोर्टलवर भरतील. त्यामुळे सुपर स्प्रेडर्सला शोधून त्यांच्यापासून अन्य नागरिकांना होणारा संसर्ग टाळण्यात येणार आहे. यासंदर्भात आयुक्त कैलास जाधव यांनी आदेश जारी केले आहेत.
इन्फो..
स्प्रेडर्समुळे होणारा संसर्ग टळेल
महापालिकेने यापूर्वी राबविलेल्या कार्यपद्धतीत नागरिकांना पकडून एकाच वाहनातून महापालिकेच्या रुग्णालयात नेले जात असे आणि त्यानंतर चाचणी केली जात असे. परंतु एकाच वाहनातून जाताना एखाद्या सुपर स्प्रेडरमुळे अन्य नागरिकांना धोका पोहोचू शकतो. त्यामुळे कार्यपद्धतीत आयुक्तांनी बदल केला आहे.