तरुणाईत व्हावा शास्त्रीय संगीताचा प्रसार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:14 AM2021-03-14T04:14:56+5:302021-03-14T04:14:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : पंडित भीमसेन जोशी हे माझ्यासाठी तर दैवतच आहेत, माझ्या बालपणापासून तरुणपणापर्यंत त्यांना कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पंडित भीमसेन जोशी हे माझ्यासाठी तर दैवतच आहेत, माझ्या बालपणापासून तरुणपणापर्यंत त्यांना कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष ऐकू, बघू शकलो, हे मी माझे भाग्य समजतो. आपल्या शास्त्रीय संगीताच्या वारशाला जर आपण तरुणाईत रुजवू शकलो तर आपल्या संगीताचे भवितव्य उज्ज्वल होणार आहे. त्यामुळेच पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षात आपल्या अभिजात शास्त्रीय संगीताकडे तरुणाईचा कल वाढावा, हीच भावना मनात असल्याचे किराणा घराण्याचे प्रख्यात शास्त्रीय गायक जयतीर्थ मेवुंडी यांनी सांगितले.
जयतीर्थ मेवुंडी यांना देश-विदेशातील अनेक शास्त्रीय संगीत सोहळ्यांमध्ये नावाजले गेले आहे. पंडितजींवर असलेली अलोट श्रद्धा आणि त्यांच्याप्रती व गायनाप्रती असलेल्या समर्पणाबाबत मेवुंडी यांनी अनेक अनुभव कथन केले. बालपणी मी त्यांची अनेक छायाचित्रे एकत्रित करून ती आमच्या देवघरात लावल्यानंतर आईने विचारले ते काय आहे, त्यावर मी सांगितले होते, संगीताच्या देवाची पूजा करतोय, तसेच बालपणी एकदा ते हुबळीला आले असताना मी एका हॉलमध्ये त्यांच्यासमोर बसलो होतो, त्यावेळी त्यांनी गळ्याला हात लावला तो जणू माझ्यासाठी आशीर्वादच होता. त्यानंतर मला त्यांनी एकदा सवाई गंधर्व महोत्सवात गाण्यासाठी बोलावले, त्यावेळी स्वत: मला तंबोरा लावून दिला, हा तर माझ्यासाठीचा सर्वोच्च सन्मान होता, तसेच त्या गायनानंतर माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन रियाज असाच सुरू ठेवा, हे शब्ददेखील माझ्या आजही स्मरणात असल्याचे मेवुंडी यांनी नमूद केले.
आजकालच्या युवा गायकांबद्दल बोलताना मेवुंडी यांनी युवकांनी रियाजाबाबत अधिक शिस्त बाळगण्याची गरज असल्याचे सांगितले. केवळ नाव आणि प्रतिष्ठेच्या मागे लागल्यानंतर युवा गायक स्वत:च्या रियाजाला तितकासा वेळ देत नाहीत, ही चिंतेेची बाब आहे.
बॉलीवुड संगीतावरही शास्त्रीय संगीताचा ठसा आहे. आजच्या पिढीतले ए.आर. रहमानसारखे कलाकारदेखील एखाद्या विशिष्ट रागात संपूर्ण रचना तयार करतात; मात्र असे प्रयोग फारसे कुणी करत नाही, तसेच सामान्य प्रेक्षकांनादेखील शांत रचना फारशा आवडत नाहीत, हे वास्तव आहे. शास्त्रीय संगीतदेखील मनोरंजक आणि आनंददायी असू शकते, हे रसिकांच्या मनावर ठसवण्याची गरज असल्याचेही मेवुंडी यांनी सांगितले. नव्या पिढीतही शास्त्रीय संगीताची आवड वाढविण्याची गरज आहे. जेव्हा तरुणाई या शास्त्रीय संगीताशी जोडली जाईल, तेव्हा त्याचा प्रसार संपूर्ण विश्वात अधिक वेगाने होईल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.