देशाच्या चुकीच्या माहितीचाच प्रसार : शेवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:17 AM2017-08-19T01:17:49+5:302017-08-19T01:18:01+5:30
आज मुघलकालीन इतिहास बदलल्याची टीका सुरू झाली असली तरी यापूर्वी देशात चुकीचा आणि पराभवाचाच इतिहास शिकविला गेला, वास्तव इतिहास बाहेर पडत असताना टीकाकारांची टीका आणखीन वाढणार असल्याचे मत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.
नाशिक : आज मुघलकालीन इतिहास बदलल्याची टीका सुरू झाली असली तरी यापूर्वी देशात चुकीचा आणि पराभवाचाच इतिहास शिकविला गेला, वास्तव इतिहास बाहेर पडत असताना टीकाकारांची टीका आणखीन वाढणार असल्याचे मत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.
भारताचा हजारो वर्षांचा इतिहास हा संघर्षाचा राहिला आहे. अरब टोळ्यांच्या आक्र मणात प्राचीन संस्कृती असलेली राष्ट्रे नामोशेष झाली. या विपरीत परिस्थितीत भारतीय संस्कृती टिकून आहे. मात्र, इतिहासात भारताला पराभूत राष्ट्र दाखविण्यात आले. प्रत्यक्षात परकीयांनी या देशावर हजारो आक्र मणे केली. मात्र, भारतीय संस्कृती अधिक बहरली असून, इतिहासाची चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्यात आल्याचे प्रतिपादन लेखक डॉ. शेवडे यांनी केले. ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभाग यांच्या विद्यमाने डॉ. कुर्तकोटी सभागृहात आयोजित केलेल्या लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्र माचे सहावे पुष्प डॉ. शेवडे यांनी ‘इस्लामी आघातांवर हिंदूचा प्रत्याघात’ या विषयावर गुंफले. याप्रसंगी डॉ. शेवडे यांनी अनुवादित केलेल्या ‘इस्लामी आघातांवर हिंदूचा प्रत्याघात’ या मराठी पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.
मागील सात दशकांपासून दिल्लीत असलेल्या तत्कालीन सरकारने भारताचा इतिहास हा पराभवाचा असल्याचे भारतीयांच्या मनावर बिंबवले. सध्या शैक्षणिक पाठ्यपुस्तकात मोगलांचा इतिहास वगळण्यात आल्यामुळे टीका होत असली तरी सीबीएसईच्या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल केवळ चार ओळींची माहिती देण्यात आली आहे, त्यावेळी संबंधितांनी का टीका केली नाही असा प्रश्न शेवडे यांनी केला.