देवळ्यात रस्त्यावरील धुळीवर टॅँकरच्या पाण्याचा शिडकावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 04:57 PM2020-03-01T16:57:28+5:302020-03-01T16:58:04+5:30
देवळा : देवळा ते इंदिरानगर या रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे . धुळीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी सदर रस्त्यावर टँकरच्या मदतीने पाण्याचा शिडकावा करण्यात येत आहे. या रस्त्यालगत सुरू असलेल्या भूमिगत गटारींच्या कामामुळे झालेल्या खोदकामाने वाहनचालकांची गैरसोय होत असून सदरचे काम तत्काळ मार्गी लावून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी शिवाजीनगर, विद्यानगर, इंदिरानगर या परिसरातील नागरीकानी केली आहे .
देवळा- विठेवाडी रस्त्यावर मध्यवर्ती ठिकाणी असलेले विद्यानगर, शिवाजीनगर ही उपनगरे विकसित झाले आहेत. या उपनगरात उच्च विद्याविभूषित प्राध्यापक, डॉक्टर, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपले अलिशान बंगले बांधले असून उच्चभ्रू नागरिकांची वस्ती म्हणून ही उपनगरे ओळखली जातात . देवळा शहरापासून इंदिरानगरपर्यंत ४०० मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही उपनगरे विकसित होत आहेत . या उपनगरांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गटारींचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली जात होती . गतवर्षी देवळा नगरपंचायतीने या उपनगरातील भुमिगत गटारींचे काम हाती घेतले. गटार करण्याचे काम सुरू झाल्यानंतर काँक्रि टीकरण केलेल्या या रस्त्यावर खोदकाम करण्यात आले. गटारींचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर रस्त्याच्या दुरु स्तीची कामे तातडीने मार्गी लावणे गरजेचे होते परंतु रस्ता दुरूस्तीचे काम अद्यापपर्यंत झाले नाही . या रस्त्याने विठेवाडी, सावकी, खामखेडा आदी गावातील शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी देवळा येथे आणतात. यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. वाहने रस्त्याने जातांना धुळीचे लोट उठतात व त्याचा त्रास उपनगरातील नागरिकांना काही महिन्यांपासून सहन करावा लागत आहे. घरांमधील वस्तूंवरही धुळीचे थर बसतात. यामुळे महिला वर्ग व नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांना दिलासा मिळण्याच्या उद्देशाने या रस्त्यावर टॅँकरच्या साहाय्याने पाण्याचा शिडकावा करून तात्पुरता दिलासा मिळत असला तरी या रस्त्याचे डांबरीकरण कधी होणार असा प्रश्न या उपनगरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे .