नाशिकमधील एकाच रुग्णालयात स्पुतनिक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:45+5:302021-07-14T04:17:45+5:30
नाशिक : नाशिककरांना प्रतीक्षा असलेली बहुचर्चित ‘स्पुतनिक व्ही’ ही लस नाशिकला प्राप्त झाली असली तरी तूर्तास एकाच ...
नाशिक : नाशिककरांना प्रतीक्षा असलेली बहुचर्चित ‘स्पुतनिक व्ही’ ही लस नाशिकला प्राप्त झाली असली तरी तूर्तास एकाच खासगी रुग्णालयात ही लस उपलब्ध झाली आहे. नाशिकमधील अनेक नागरिकांनी खासगी रुग्णालयांबाबत या लसीबाबतची चौकशी केलेली आहे. अनेकांनी याबाबतची आगाऊ नोंदणी देखील केली असल्याने पूर्ण क्षमतेने लस दाखल होण्याची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी झालेला असला तरी कोराना अद्यापही पूर्णपणे गेलेला नसल्याने लसीकरण हाच प्रभावी उपचार मानला जातो. जास्तीत जास्त लसीकरण करण्याला शासनाकडून प्राधान्य दिले जात आहे. जिल्ह्यात सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी दिल्या जात आहेत. त्यातच लसी पूर्ण क्षमतेने येत नसल्याने लसीकरणात काहीसा खंड पडला असून, लसीकरण केंद्रांबाहेर नागरिकांच्या रांगा लागत आहेत.
भारतात रशियाची स्पुतनिक व्ही लस आल्यानंतर अनेक राज्यांना या लसीचा मागणीनुसार पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार नाशिकच्या तीन खासगी रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध होणे अपेक्षित होते. मात्र, शहरातील सह्याद्री रुग्णालयात स्पुतनिक लस उपलब्ध झाली असून, उर्वरित दोन रुग्णालयांना अजूनही प्रतीक्षा आहे.
या लसीच्या एका डोससाठी १४०० रुपये शुल्क आकारले जाणार असून २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. सध्या लस तुटवडा लक्षात घेता स्पुतनिकचा चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. मात्र, लसीच्या एका डोसची किंमत लक्षात घेता. ज्यांना ही लस घेणे परवडणारे आहे आणि केंद्रावरील रांगेत
उभे राहाणे शक्य नाही, असे लोक खासगी रुग्णालयात जाऊन लस घेण्याला प्राधान्य देऊ शकतात. अद्याप केवळ एकाच रुग्णालयात ही लस आलेली असून, इतर दोन रुग्णालयांमध्ये देखील नोंदणी झालेली आहे. स्पुतनिक लस घेणाऱ्यांकडून विचारणा होत असल्याचे संबंधित दोन्ही रुग्णालयांकडून सांगण्यात आले.