भंगार बाजाराचे अतिक्रमण रोखण्यासाठी फिरते पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:20 PM2017-10-24T23:20:27+5:302017-10-25T00:12:39+5:30
सातपूर-अंबड लिंकरोडवर पुन्हा भंगार बाजार वसू नये यासाठी महापालिकेने पोलिसांच्या मदतीने एक फिरते पथक तयार केले असून, सदर पथकाची करडी नजर परिसरावर असणार आहे. सदर पथकाला दररोज वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी काढले आहेत.
नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोडवर पुन्हा भंगार बाजार वसू नये यासाठी महापालिकेने पोलिसांच्या मदतीने एक फिरते पथक तयार केले असून, सदर पथकाची करडी नजर परिसरावर असणार आहे. सदर पथकाला दररोज वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी काढले आहेत. महापालिकेने जानेवारी २०१७ मध्ये भंगार बाजार हटविण्याची कारवाई केली होती. मात्र, पुन्हा एकदा भंगार बाजाराने हातपाय पसरले होते. भंगार माल विक्रेत्यांनी तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारून मोठ्या प्रमाणावर माल आणून ठेवला होता. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने संबंधित व्यावसायिकांना पुन्हा एकदा नोटिसा बजावत कारवाईचा इशारा दिला होता परंतु, व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती. मात्र, न्यायालयाने व्यावसायिकांची याचिका फेटाळून लावत दहा हजाराचा दंड ठोठावला होता. त्यानंतर महापालिकेने दि. १२ आॅक्टोबरपासून ऐन दिवाळीत भंगार बाजारावर कारवाईचा हातोडा उगारला. भंगार व्यावसायिकांचा माल जप्त करण्याचीही कारवाई केली. आता पुन्हा भंगार बाजार वसू नये, होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी महापालिकेने एक फिरते पथक तयार केले आहे. यामध्ये पथकप्रमुख म्हणून अतिक्रमण विभागाचे अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सातपूर विभागातील उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, विभागीय स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता निरीक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे. सदर पथक कायमस्वरूपी नेमण्यात आले असून, पथकाने दररोज परिसरात फिरून पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घ्यायची आहे. शिवाय, कुठे अतिक्रमण होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तत्काळ अतिक्रमण विभागाला द्यायची आहे. पथकाने दररोजचा अहवालही अतिरिक्त आयुक्तांना सादर करायचा असून, कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.