श्रीकृष्ण , श्रीदत्त मंदिरांमध्ये ‘गोविंद’च्या गजरात पविते अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:23 AM2018-08-27T00:23:03+5:302018-08-27T00:23:42+5:30
राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या मायेच्या धाग्याचा आनंदमय सोहळा होय. या सणालाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. महानुभाव पंथातदेखील परमेश्वराला सूत गुंफलेले नारळ म्हणजे पविते अर्पण करण्याचा सण साजरा करण्यात येतो.
नाशिक : राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या मायेच्या धाग्याचा आनंदमय सोहळा होय. या सणालाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. महानुभाव पंथातदेखील परमेश्वराला सूत गुंफलेले नारळ म्हणजे पविते अर्पण करण्याचा सण साजरा करण्यात येतो. शहरातील विविध श्रीकृष्ण व श्रीदत्त मंदिरांमध्ये पविते अर्पण करण्याचा सोहळा ‘गोविंद’च्या गजरात संपन्न झाला. परमेश्वरबरोबर गुरूलादेखील पविते अर्पण करण्यात येते. यासाठी महानुभाव पंथीय श्रीकृष्ण व श्रीदत्त मंदिरात उत्साहाचे वातावरण असून, आकर्षक सजावट करण्यात येत आहे. नारळी पौर्णिमेच्या सणाला तसेच चतुर्दशीला महानुभाव पंथात पविते पर्व हा धार्मिक उत्सव साजरा करण्यात येतो. भगवान श्रीकृष्ण तथा पंचावतारांना सूताने गुंफलेल्या नारळाचे पाविते अपर्ण करण्यात येते. जन्माष्टमीपर्यंत हा उत्सव तथा विधी सुरू असतो. यानिमित्त नारळी पौर्णिमेपासून ते जन्माष्टमीपर्यंत मंदिरात आणि आश्रमात आकर्षक सजावट करण्यात येते. तसेच उटी, उपहार, पूजा, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होतात. घरोघरीही देवघराची सजावट आणि आरास करण्यात येते. नाशिक जिल्ह्यात महानुभाव पंथाची अनेक तीर्थस्थाने असून, यात कसबे सुकेणे तथा सुकदाणी बाबा आणि सिन्नर या तीर्थक्षेत्राचे महत्त्वाचे स्थान आहे. याठिकाणी चतुर्दशीला नारळी पौर्णिमेला देवाला पविते अर्पण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते तसेच नाशिक शहरात मोरवाडी येथील दत्तमंदिर, श्रीकृष्ण मंदिर, गंगापूर गावातील दत्तमंदिर, आडगाव येथील श्रीकृष्ण मंदिरातदेखील पविते पर्वविधी साजरा करण्यात आला. सर्वच मंदिरांत आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली असून, नारळी पौर्णिमेला भाविकांनी देवाला तसेच गुरूंना गोविंदाच्या गजरात पविते अर्पण केले.
पर्वताची गुंफण
नारळी पौर्णिमा तसेच चावदस यादिवशी श्रीकृष्ण मूर्ती आणि संत-महंत यांना पविते अर्पण करण्याची प्रथा आहे. श्रीफळ हे मांगल्याचे प्रतीक असून, त्याभोवतीचा सुताचा धागा हा आदर आणि प्रेमाचा भाव व्यक्त करण्यासाठी गुंफला जातो. नारळाला सुताच्या धाग्याने गुंफून त्यांच्या दोन्ही टोकाला दोन सुपाऱ्या बांधण्यात येतात. गोविंद-गोविंच्या गजरात हा विधी पार पडतो.