सिन्नरला श्रीक्षेत्र पट्टीशाळेचा यात्रोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 05:46 PM2019-12-19T17:46:59+5:302019-12-19T17:48:09+5:30
सिन्नर : श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या येथील आडवा फाटा परिसरातील देवीरोड भागात असणाऱ्या श्री चक्रधर स्वामी मंदिरात श्री क्षेत्र पट्टीशाळा यात्रोत्सव हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. यात्रोत्सवाचे २३ वे वर्षे होते.
पहाटे ५ वाजता मंगलस्नान, सकाळी ७ वाजता गीतापाठ पारायण, ८.३० वाजता ज्योतिषाचार्य मानसराज शास्त्री यांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्तीस गंधाक्षता लावून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शहरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर धर्म सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सुकेणेकर बाबा यांची उपस्थिती लाभली. चिंचोडीकर बाबा (जाळीचा देव, बुलढाणा) यांचे प्रवचन पार पडले. यामध्ये त्यांनी भगवान श्री चक्रधर स्वामींची आणि त्यांचे शिष्य नागदेवाचार्य यांची लिला सांगितली. व्यसनाने ग्रस्त आचार्य नागदेव यांची स्वामींशी झालेली पहिली भेट आणि त्यांच्यामध्ये झालेला बद्दल ही शिकवण आपण सर्वांनी आत्मसात केली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. १२ व्या शतकात सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिर, चौदाचौक वाडा, पट्टी शाळा, भोजनता अशा अनेक ठिकाणी चक्रधर प्रभुंनी आपल्या पदस्पर्शाने पवित्र केलेले तीर्थ भक्तांसाठी सदैव खुली असतात असेही त्यांनी सांगितले. यावेळी महंत भीष्माचार्य बाबा, मराठे बाबा, अचलपूरकर बाबा, अर्जुन सुकेणेकर आदींसह संत, महंत, वासनिक, सद्भक्त उपस्थित होते. महाआरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ऋषीराज परांडेकर यांनी सूत्रसंचालन केले.