श्रीधर फडके यांच्या स्वरांनी नाशिककर रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:48 AM2018-12-23T00:48:30+5:302018-12-23T00:49:05+5:30
अवघ्या मराठी मनाला मोहिनी घालणाऱ्या शब्दप्रभू गदिमा आणि स्वरप्रभू बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायणा’चे ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्या सुरेल स्वरातील गायनाने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले.
नाशिक : अवघ्या मराठी मनाला मोहिनी घालणाऱ्या शब्दप्रभू गदिमा आणि स्वरप्रभू बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायणा’चे ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्या सुरेल स्वरातील गायनाने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले.
गोविंदनगर येथे संस्कृती वैभवतर्फे सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या त्रिवेणी महोत्सवाच्या दुसºया दिवशी शनिवारी (दि.२२) गीतरामायणाच्या सादरीकरणातून कला क्षेत्रातील या त्रयींना मानवंदना देण्यात आली. यावेळी श्रीधर फडके यांनी सादर केलेल्या ‘स्वयें श्री रामप्रभू ऐकती, लव-कुश रामायण गाती’ या गीतापासून सुरू झालेला स्वरयज्ञ उत्तरोत्तर रंगत गेला. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रत्येक गाण्याला दाद दिली. यावेळी श्रीधर फडके यांच्यासह निवेदिका सुकन्या जोशी यांनी प्रत्येक गाण्याच्या निर्मितीमागच्या आठवणींना उजाळा देताना गदिमा आणि सुधीर फडके यांच्यात झालेल्या संवादाचे विविध किस्सेही रसिकांसमोर उलगडून सांगतानाच ‘दशरथा हे घे पायस दान’, ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला’, ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा’, ‘आज मी शापमुक्त जाहले’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’ आदी गीतांमधून रामायनातील विविध प्रसंग श्रीधर फडके यांनी रसिकांसमोर उभे केले. त्यांना तबल्यावर तुषार आग्रे, किबोर्डवर अतुल माळी, बासरीच्या सुरांसह सचिन जगताप यांच्यासह व्यंकटेश कुलकर्णी, प्रदीप शेंगाळे, वंदना सहस्त्रबुद्धे, अमृता धारप यांनी साथसंगत केली.
साठवणीतील आठवणींना मिळणार उजाळा
त्रिवेणी महोत्सवात रविवारी (दि.२३) संस्कृती वैभव पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यात ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की (मुंबई), ज्येष्ठ संगीतकार श्रीकृष्ण चंद्र्रात्रे (नाशिक) यांना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘आठवण एक साठवण’ कार्यक्रमातून राजदत्त यांच्यासह अभिनेत्री आशालता वाबगावकर, अशोक पत्की व संगीतकार श्रीधर फडके यांच्याशी मुलाखतकार सुधीर गाडगीळ संवाद साधणार आहेत.