दहावीत बाल कीर्तनकार ज्ञानेश्वरीची यशस्वी भरारी
By Suyog.joshi | Published: May 27, 2024 03:42 PM2024-05-27T15:42:12+5:302024-05-27T15:42:31+5:30
ज्ञानेश्वरी लहानपणापासून आपल्या वडिलांसोबत भजनाच्या कार्यक्रमासाठी जात असे, त्याच्यातूनच तिला खऱ्या अर्थाने भजनाची आवड निर्माण झाली.
संजय शहाणे
नाशिक : घरची हलाखीची परिस्थिती. यातही गावोगावी कीर्तन करत उदरनिर्वाहासाठी संघर्ष करत येथील डे केअर सेंटर शाळेची विद्यार्थिनी व बालकीर्तनकार ज्ञानेश्वरी भोजदरे हिने दहावीत ८३ टक्के गुण मिळवित यश संपादन केले. महाराष्ट्रात गावोगावी कीर्तन करून मिळणाऱ्या मोबदल्यातून ज्ञानेश्वरी कुटुंब चालवण्यासाठी आई-वडिलांना मदत करते. ज्ञानेश्वरीची घरची परिस्थिती तशी गरिबीचीच आहे. वडील एका कंपनीमध्ये पार्सल डिलिव्हरीचे काम करतात. आई घरकाम करते. तिला दुसरे भावंड नाही. ती एकटीच मुलगी आहे.
वडिलांना वारकरी संप्रदायाची आवड असल्याने ते चांगले भजन करतात. त्यांचे गायनदेखील चांगले आहे. ज्ञानेश्वरी लहानपणापासून आपल्या वडिलांसोबत भजनाच्या कार्यक्रमासाठी जात असे, त्याच्यातूनच तिला खऱ्या अर्थाने भजनाची आवड निर्माण झाली. ती इयत्ता ९वी आणि १०वी मध्ये असताना प्रवचन आणि कीर्तन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी येऊ लागली. अशावेळी मात्र ती शाळेत येऊ शकत नव्हती. उत्कृष्ट बाल कीर्तनकाराच्या यादीमध्ये तिचे नाव नंबर १ ला आहे. तिच्या या कीर्तनाच्या सेवेतून तिला चांगला आर्थिक मोबदलासुद्धा मिळत आहे आणि आपल्या वडिलांना कुटुंब चालवण्यासाठी मदत करत आहे. एवढ्या लहान वयात तिने स्वतःला सिद्ध केले आहे. तिच्या या कर्तृत्वामुळेच तिने बोर्डाच्या १०वीच्या परीक्षेत ८३ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तिला संस्थेचे सचिव गोपाळ पाटील, मुख्याध्यापक वासंती पाठक, सह शिक्षक वृंदांचे मार्गदर्शन लाभले आहे.
महाराष्ट्रभर कीर्तने
आठवड्यातील दोन ते तीन दिवस तिचे प्रवचन व कीर्तनाचा कार्यक्रम हमखास असायचा. ती कधी अर्धा दिवस शाळेत यायची. कधी कधी तर दोन-तीन दिवस शाळेत यायची नाही. तरीदेखील ती आपला गृहपाठ, स्वाध्याय, परीक्षा यासाठी ती वेळ काढायची. वेळेत सर्व पूर्ण करत असे. ती महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जाते आणि उत्कृष्ट असे कीर्तन करते.