एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी थकबाकी वसुलीचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:13 AM2021-05-22T04:13:57+5:302021-05-22T04:13:57+5:30
नाशिक : मागीलवर्षी कोरोनाच्या काळात प्रवासी वाहतूक बंद असल्याने महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला तर यंदाही केवळ अत्यावश्यक ...
नाशिक : मागीलवर्षी कोरोनाच्या काळात प्रवासी वाहतूक बंद असल्याने महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला तर यंदाही केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असून प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला झाल्याने महामंडळाकडून शासनाकडे थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
राज्य परिवहन महामंडळाने राज्य शासनाच्या आदेशाने मागीलवर्षी कोरेानाच्या काळात परप्रांतीय मजुरांची वाहतूक केली. त्याबरोबरच उत्पन्नवाढीसाठी मालवाहू बसेसेच्या माध्यमातून देखील शासनाच्या इतर विभागांच्या साहित्यांची वाहतूक केली. यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे परप्रांतीय तसेच मालाची वाहतूक करण्यात आली होती. यातील काही रक्कम शासनाने अदा केलेली आहे तर काही रक्कम बाकी आहे. पोलीस तसेच आरेाग्य विभागालादेखील अत्यावश्यक सेवेनुसार बसेस पुरविण्यात आलेल्या आहेत. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून बसेस बंद असल्याने आता पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी आता थकीत रक्कम वसुलीसाठी शासनाकडे महामंडळाकडून मागणी करण्यात आली आहे.
--कोट--
मागील महिन्यांपर्यंतचे कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले आहे. परंतु मे महिन्याच्या पगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे यासाठी थकबाकी वसुलीसाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रयत्न केले जात आहेत.
- आर.एन. पाटील, विभाग नियंत्रक.
--इन्फो--
एप्रिल महिन्याचे वेतन मिळाले आहे परंतु आता मे महिन्याचे वेतनाबाबतची अनिश्चितता आहे. बसेस बंद असल्यामुळे उत्पन्नच मिळत नाही. त्यामुळे वेतनाबाबत महामंडळ काय निर्णय घेणार यावर सर्वकाही अवलंबून आहे.
- रामदास खैरनार, कर्मचारी.
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शासनाकडे पैशांची मागणी करावी लागते. शासनानेच महामंडळाची थकीत वेळेवर दिली तर पुढील महिन्यापुरता तरी वेतनाचा प्रश्न मिटू शकतो.
- कैलास बडाख, कर्मचारी
महामंडळ आर्थिक अडचणीत असतांना मात्र खासगी शिवशाहीला पैसे भरून द्यावे लागतात. खासगी ठेकेदाराला अनेक कामे देण्यात आली आहेत त्यावरही लाखोंचा खर्च होतो. या खर्चात बचत केली तर उत्पन्नात भरच पडेल.
- अंबादास नेहते, कर्मचारी
--इन्फो--
नाशिकला मिळाली थकबाकी
मागीलवर्षी परप्रांतीय मुजरांना विविध राज्यांच्या सीमारेषेवर सेाडण्यासाठी महामंहळाने बसेस पुरविल्या. नाशिक विभागाने देखील या काळात परप्रांतीय मुजरांची वाहतूक केली. यापोटी देय असलेली रक्कम राज्य शासनाकडून मिळाली असल्याने नाशिक विभागाचा प्रश्न काहीप्रमाणात मिटला आहे. सर्वात मेाठी वाहतूक नाशिक विभागाने केलेली होती. त्यामुळे नाशिकला देय असलेली रक्कम मिळाली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
--आकडेवारी--
विभागातील एकूण आगार
१३
एकूण कर्मचारी
४२००
सध्याचे रोजचे उत्पन्न
१७०००
महिन्याला पगारावर होणार खर्च
८ कोटी, ४० लाख