एसटी बसच्या सुट्या भागांची खरेदी रखडली
By admin | Published: November 2, 2014 11:39 PM2014-11-02T23:39:16+5:302014-11-02T23:39:36+5:30
साहित्याची प्रतीक्षा : सहा महिन्यांपासून होतेय मागणी; चालक-वाहकांकडून नाराजी व्यक्त
नाशिक : दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसेसची सुट्या भागांविना गैरसोय होत असून, अनेक महिन्यांपासून मागणी करूनही साहित्य उपलब्ध होत नसल्याने चालक- वाहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महामंडळाच्या बसेस रस्त्यातच बंद पडणे, पंक्चर होणे, ब्रेक फेल होणे यांसारख्या घटना घडल्या असून, रस्त्यावरच बस बंद पडून प्रवाशांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची वेळही बसचालकांवर आली आहे. त्यामुळे जुन्या झालेल्या बसेसला विविध सुट्या भागांचा पुरवठा करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होते आहे; परंतु मध्यवर्ती कार्यालय आणि विभागीय कार्यालयाकडून त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत असून, सुट्या भागांअभावी एखादी दुर्घटना झाल्यानंतर महामंडळ सुधारणार का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी केला आहे.
मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने राज्यातील सर्व आगारांना सुटे भाग पुरवले जातात. त्याप्रमाणेच विभागीय पातळीवर स्थानिक अधिकाऱ्यांनाही काही प्रमाणात त्याची खरेदी करायचे अधिकार असतात; परंतु असे असतानाही गेल्या सहा महिन्यांपासून ही खरेदीच रखडली असून, चालक आणि वाहक त्यामुळे बेजार झाले आहेत. अनेक बसेसला तर प्रक्रिया केलेले टायर आणि ट्यूब बसविण्यात आले आहेत. त्यामुळे बस व्यवस्थित प्रवास करेल याची कोणतीही खात्री चालकांना देता येत नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात घातला जात असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. प्रवासी जमा करण्यासाठी महामंडळाच्या वतीने विविध चांगल्या योजना राबविल्या जातात. सुरक्षित वाहतूक म्हणूक प्रवाशीही महामंडळालाच प्राधान्य देतात. असे असताना लाखो रुपयांचा नफा कमवणाऱ्या महामंडळाने किमान सुट्या भागांच्या खरेदीसाठी तरी टाळाटाळ करू नये, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)