विचित्र अपघात : रिक्षासह एसटी बस विहिरीत; 25 प्रवासी ठार, 30 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 06:09 AM2020-01-29T06:09:13+5:302020-01-29T06:22:25+5:30
कळवण आगाराची बस धुळ्याहून कळवणकडे जात होती.
नाशिक : टायर फुटून एसटी महामंडळाची धुळे-कळवण बस शेजारून जाणाऱ्या अॅपे रिक्षावर आदळली. नंतर रिक्षा व बस रस्त्याजवळच्या शेतातील खोल विहिरीत पडून झालेल्या भीषण अपघातात २५ जण ठार झाले तर ३० प्रवासी जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी देवळा-मालेगाव रस्त्यावरील मेशी फाट्याजवळ हा अपघात झाला. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
कळवण आगाराची बस धुळ्याहून कळवणकडे जात होती. या बसच्या शेजारून प्रवाशांनी भरलेली अॅपे रिक्षा जात होती. त्याच वेळी बसचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस शेजारच्या रिक्षावर धडकली. त्यानंतर, रिक्षाला फरफटत नेत बसही विहिरीत कोसळली.
अपघातानंतर प्रवाशांनी आक्रोश सुरू केला. तो आरडाओरडा ऐकून आसपासचे शेतकरी मदतीसाठी धावले, परंतु विहिरीत उतरण्यासाठी जागाच नव्हती. विहिरीत सुमारे २५ ते ३० फूट पाणी होते. त्यात रिक्षा आणि त्यावर बस अशी स्थिती होती. काही स्थानिकांनी बसची पाठीमागची काच फोडली आणि आतमध्ये शिरून जखमी प्रवाशांना एकेक करून बाहेर काढण्यास सुरुवात केली. स्थानिकांनी बसमधून ८ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले.
जखमींना तातडीने देवळा ग्रामीण रुग्णालय तसेच उमराणे व मालेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत दाखल केले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर हेही मदतकार्यात सहभागी झाले. क्रेनच्या साह्याने बस बाहेर काढण्यात आल्यानंतर रिक्षा बाहेर काढण्यात आली. अंधारामुळे मदतकार्यात अडथळे येत होते.
जखमीवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.पी. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, देवळ्याचे ग्रामीण रुग्णालय व कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार सुुरू केले. देवळा तालुका डॉक्टर्स असोसिएशनचेही त्यांना या कामात मदत केली. अपघातस्थळी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी धाव घेतली आणि मदतकार्य वेगाने सुरू झाले.
मुलासाठी मुलगी पाहून येताना..!
मालेगाव तालुक्यातील येसगाव येथील आझीम मन्सुरी यांचा मोठा मुलगा उस्मान मुंबईत बस चालक आहे. उस्मानचे आठ दिवसांपूर्वीच धुळे येथील हुसेन मन्सुरी यांची कन्या शबनमशी लग्न ठरले. दुसरा मुलगा रशीदला स्थळ बघायला देवळा येथे कुटुंबीय रिक्षाने गेले होते. परतत असताना ते अपघातात मरण पावले.
मृतांची समजलेली नावे
अझीम मन्सुरी, अन्सारभाई मन्सुरी, शाहीस्ता मन्सुरी, जावेद मन्सुरी, कुर्बान मन्सुरी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, फारुख मन्सुरी, रघुनाथ मेतकर, अझीम नथू मन्सुरी, एसटी चालक प्रकाश बच्छाव, शांताराम निकम, शीतल अहिरे, मालेगाव उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ परिचारिका अंजना झाडे.
- एसटी बसमध्ये ४६ तर रिक्षामध्ये ९ प्रवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Maharashtra Transport Minister Anil Parab: The accident near Nashik is very unfortunate. A compensation of Rs 10 lakhs each will be given to the kin of the deceased and free medical treatment to all the injured. https://t.co/gUiObc8ZYX
— ANI (@ANI) January 28, 2020