एस.टी. बसेस सुरू; मात्र कर्मचारी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 02:33 AM2022-01-13T02:33:19+5:302022-01-13T02:33:36+5:30
विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून एस.टी. कर्मचारी आंदोलन करीत असताना एस.टी. महामंडळाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची तात्पुरती भरती करून बुधवारी काही बसेस सुरू केल्या; मात्र तत्पूर्वी त्यांनी दुखवटा आंदोलनातील कर्मचाऱ्यांना पहाटेच घरातून ताब्यात घेतल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. सायंकाळी कर्मचाऱ्यांना सोडून देण्यात आले असले तरी आंदोलन मोडून काढण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. कर्मचारी कामावर रुजू होत नसल्याने महामंडळाने तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी चालकांची भरती करून त्यांना कामगिरीवर नेमणूक देण्यात आली.
नाशिक : विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून एस.टी. कर्मचारी आंदोलन करीत असताना एस.टी. महामंडळाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची तात्पुरती भरती करून बुधवारी काही बसेस सुरू केल्या; मात्र तत्पूर्वी त्यांनी दुखवटा आंदोलनातील कर्मचाऱ्यांना पहाटेच घरातून ताब्यात घेतल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. सायंकाळी कर्मचाऱ्यांना सोडून देण्यात आले असले तरी आंदोलन मोडून काढण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. कर्मचारी कामावर रुजू होत नसल्याने महामंडळाने तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी चालकांची भरती करून त्यांना कामगिरीवर नेमणूक देण्यात आली. बुधवारी नाशिक आगारातून बसेस सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यानुसार पोलीस बंदोबस्तात ठक्कर स्थानकातून बसेस सुरू करण्यात आल्या. तत्पूर्वी बुधवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी संशयित आंदोलनकर्त्यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतल्यामुळे एकच गोंधळ झाला.
बसेस सुरू करण्यास विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ११ एस.टी. कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पंचवटी, मुंबईनाका, भद्रकाली, सरकारवाडा पोलीस ठाण्यांमध्ये बसवून ठेवण्यात आले होते. दुपारनंतर या कर्मचाऱ्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना सोडून देण्याचे आदेश दिले. सायंकाळी कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करीत न्यायदेवतेच्या मंदिरात न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करीत महामंडळ आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.
दरम्यान, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दिवसभरात १३० बसेस धावल्याचा दावा महामंडळाने केला; मात्र दुपारनंतर १२ कंत्राटी कर्मचारी निघून गेल्याने महामंडळावर नामुश्कीदेखील ओढावली.