दुसऱ्या दिवशीही एसटीचा संप सुरुच, प्रवाशांचे हाल: खाजगी वाहतुकीवर भिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:37 PM2018-06-09T12:37:26+5:302018-06-09T12:37:26+5:30
नाशिक : एसटी कर्मचारी संघटनांसोबत चर्चा व वेतनवाढीचा करार न करता एकतर्फी जाहीर केलेल्या असमाधानकारक वेतनवाढीच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला संप दुसºया दिवशी शनिवारी (दि.९) देखील सुरुच असून सकाळपासून फार कमी बस शहरात धावलेल्या पहायला मिळाल्या.
पहाटपासून शहराच्या निरनिराळ्या भागातुन शेकडो बसेस प्रवाशांच्या सेवेत असणे अपेक्षीत असताना विविध आगारांतुन पहाटपासून केवळ २५ ते ३० बस सोडण्यात आल्या. नाशिक जिल्ह्यात एसटीचे तेरा डेपो असून, त्याद्वारे नियमित सुरू असलेल्या बसफेºयांऐवजी फार कमी बसफेºया झाल्या. शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या कर्मचाºयांनी संपात सहभाग घेतलेला नसल्याने त्यांनीच बससेवा दिल्याचे दिसून आले. संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून खाजगी वाहनांची मदत घ्यावी लागत आहे. शहरात रिक्षा तर ग्रामीण भागात जाण्यासाठी टॅक्सी, खाजगी बस, टॅक्स आदिंची मदत घेतली जात आहे. खाजगी वाहतुकदारांनी भाडेवाढ केल्याने प्रवाशांना आर्थिक फटकाही सोसावा लागत आहे. दरम्यान, संपात सहभागी झालेल्या नाशिक आगारातील कर्मचाºयांना संप मागे घेण्यासंबंधी विनंती केली जात असून सायंकाळपर्यंत संपाबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.