आडगावजवळ एसटी-कंटेनरचा अपघात
By admin | Published: January 19, 2017 12:08 AM2017-01-19T00:08:23+5:302017-01-19T00:08:37+5:30
सहा जण जखमी
पंचवटी : शहर वाहतूक एसटी बस, कंटेनर व दुचाकी या तिहेरी अपघातात सहा जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि़१८) सायंकाळच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव स्मशानभूमीजवळ घडली़ या अपघातातील जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सुदैवाने जीवितहानी झालेली नाही़ या अपघातामध्ये बसचे मोठे नुकसान झाले असून, कंटेनर रस्त्यावर उलटल्याने वाहतूक कोंडी झाली होती़ आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव स्मशानभूमीजवळ सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शहर वाहतूक बस (एमएच १४, बीटी २९२) आडगावकडून ओझरकडे जात होती़ यावेळी ओझरकडून येणारा कंटेनर (एमएच ४६, एएफ ७६५६) व वळण घेत असलेली दुचाकी (एमएच १५, सीक्यू ६०१४) यांच्यामध्ये अपघात झाला़ सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही़ या अपघातात जखमी झालेले सचिन संजय वाघ (१८, रा़ जानोरी, ता़ दिंडोरी, जि़ नाशिक) व हृतिक भाऊसाहेब निकम (१६, रा़ लक्ष्मीनगर, अमृतधाम, नाशिक) या दोघांवर लोकमान्य हॉस्पिटल, श्रेया पगार (२५, रा़ ओझर) या तरुणीवर अपोलो रुग्णालय तर उर्वरित तिघांवर मविप्रच्या डॉ़ वसंत पवार रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ या अपघाताची तीव्रता इतकी होती की शहर बसची डावी बाजू अक्षरश: अर्धी कापली गेली आहे़ दरम्यान, या अपघातानंतर उलटलेल्या कंटेनरमुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती़ अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती़ या अपघाताची आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते़ (वार्ताहर)