शहर बसेस बंद करण्यावर एसटी महामंडळ ठाम
By admin | Published: May 16, 2017 12:42 AM2017-05-16T00:42:32+5:302017-05-16T00:42:44+5:30
नाशिक : शहर बससेवा चालविण्याबाबत महापालिकेकडून स्पष्ट नकार देण्यात आल्यानंतरही एस. टी. महामंडळाने शहरातील बससेवा हळूहळू बंद करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहर बससेवा चालविण्याबाबत महापालिकेकडून स्पष्ट नकार देण्यात आल्यानंतरही एस. टी. महामंडळाने शहरातील बससेवा हळूहळू बंद करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. शहरातील विविध मार्गांवरील सुमारे १२५ बसफेऱ्या बंद करण्यात आल्या असून, टप्प्याटप्प्याने सर्व बसेस बंद करण्याची मानसिकता महामंडळाने केली आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारचे फेऱ्या कपात करताना महामंडळाने कुणालाही विश्वासात न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहर बससेवा चालविण्याची प्राथमिक जबाबदारी ही महापालिकांची असल्याने नाशिक महापालिकेने शहर बससेवा चालविण्यास घ्यावी, असा पत्रव्यवहार गेल्या जानेवारीपासून महामंडळाने सुरू केला आहे. महामंडळाने दोन वेळा निर्वाणीचे पत्रेही महापालिकेला धाडली आहेत. या पत्रांना उत्तर देताना महापालिकेने बससेवा चालविण्यास असमर्थता दर्शवित पालिकेसाठी हा ऐच्छिक विषय असल्याचे उत्तर परिवहन महामंडळाने दिलेले आहे. असे असताना एस.टी. महामंडळाने पालिकेशी कोणतीही चर्चा न करता शहरातील बसेस बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आत्तापर्यंत विविध मार्गांवरील १२५ बसफेऱ्या बंद करण्यात आल्या असून, गेल्या दोन महिन्यांत २० किलोमीटरची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
एस.टी. महामंडळाने पहिल्या टप्प्यात बसफेऱ्या बंद करण्यावर भर दिला असून, ज्या भागात उत्पन्न कमी आहे अशा मार्गावरील बसेस बंद करण्यात येणार आहे. मात्र पुढे टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहराची बसच बंद करण्यात येईल, असा ठाम विश्वास येथील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
नाशिक शहरात सुमारे २२५ बसेसच्या माध्यमातून ४२ ते ४५ हजार किलोमीटरपर्यंत बसेस चालविल्या जातात. डेपो एक आणि डेपो क्रमांक दोन याप्रमाणे शहरातून बससेवा चालविली जाते. आता या दोन्ही डेपोचे रोजचे उत्पन्न, बसेसच्या फेऱ्या आणि भारमान याबाबत माहिती संकलनाचे काम जोरदार सुरू आहे. या माहितीवरूनच महामंडळाने शहरातील सुमारे १२५ बसफेऱ्या बंद केल्या आहेत. महामंडळाने उचलेल्या या धाडसी पावलामुळे शहर बस ही पालिकेलाच चालवावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.