एस.टी. कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळतो, ना वैद्यकीय बिले मिळतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:17 AM2021-09-14T04:17:48+5:302021-09-14T04:17:48+5:30

संसर्गजन्य आजारासाठी बिले सादर केल्यानंतर तर त्याबाबत प्रचंड संशयाने पाहिले जात असल्याचा कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे. त्यांना अगदी जेमतेम बिल ...

S.T. Employees don't get paid on time, they don't get medical bills! | एस.टी. कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळतो, ना वैद्यकीय बिले मिळतात!

एस.टी. कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळतो, ना वैद्यकीय बिले मिळतात!

Next

संसर्गजन्य आजारासाठी बिले सादर केल्यानंतर तर त्याबाबत प्रचंड संशयाने पाहिले जात असल्याचा कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे. त्यांना अगदी जेमतेम बिल मिळते, तेही सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरच. सध्या तर आर्थिक अडचण असल्यामुळे वैद्यकीय देयके मिळणेदेखील कठीण झाले आहे. कमीत कमी आठ ते जास्तीत जास्त वर्षभराचा कालावधी बिले मिळण्यासाठी लागतो. त्यातही काही टक्के आधी आणि उर्वरित नंतर दिले जाते.

--इन्फो--

आठ ते बारा महिन्यांचा विलंब

वैद्यकीय बिले सादर करण्याची प्रक्रियाच मोठी अडचणीची आणि वेळखाऊ आहे. डॉक्टर भेटण्यावर पुढचे सर्व अवलंबून आहे. त्यातही अनेक कागदपत्रे आधीच नाकारली जातात. त्यामुळे जमेल तेवढी धावाधाव करून मध्यवर्ती कार्यालयाकडे बिले पाठविली जातात. तेथून ती येण्यास आठ ते बारा महिन्यांचा कालावधी नक्की लागतो.

--इन्फो--

विलंबाबाबत अधिकाऱ्यांचे मौन

कर्मचाऱ्यांना गंभीर आणि किरकोळ अशा आजारासाठी वैद्यकीय बिले दिली जात असली तरी ती कधी मिळतील, याची शाश्वती नसते. याविषयी येथील कामगार अधिकारी तसेच विभागीय लेखा अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी याबाबत काहीही सांगता येणार नसल्याचे सांगितले. बिले सध्या दिली जातात की नाही, किंवा किती बिले पडून आहेत, याची माहिती देण्यात आली नाही.

--कोट--

उपचारावरील खर्च कोठून आणायचा,

दुचाकीवर मोठा अपघात झाला होता. त्यामुळे महिनाभर रुग्णालयात उपचार त्यानंतर घरीच थांबणे भाग पडल्याने वैद्यकीय उपचार सुरूच होते. याबाबतचे बिल सादर केल्यानंतर त्यामध्ये मोठी कपात करण्यात आली. वैद्यकीय बिल मिळेल, असे वाटले होते; परंतु तब्बल दीड वर्ष वाट पहावी लागली.

- एक कर्मचारी, एस.टी. महामंडळ.

गेल्या आठ महिन्यांपासून वैद्यकीय बिल अडकून पडले आहे. एकतर गेली दीड वर्षे केारेानामुळे वेतनाची अडचण झालेली आहे. ड्युटी करूनही हाती काहीच पडले नाही. या काळात कर्ज झाले. आजारामुळे ते अधिक वाढले. महामंडळाकडे बिल सादर करून आठ महिने झाले आहेत; मात्र त्यात त्रुटी सांगितल्या जात आहेत. बिल मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे.

- एक कर्मचारी, एस.टी. महामंडळ.

--इन्फो--

पगाराची अनिश्चितता कायम

राज्य शासनाच्या निधीवर गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले आहे. शासनाने एकदा ६०० तर एकदा ९०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यामुळे दोन महिन्यांचे वेतन मिळाले. आता सप्टेंबरच्या महिन्यातील वेतनाचे काय होते, याबाबत आताच कर्मचाऱ्यांच्या मनात शंका उपस्थित झाली आहे.

वेतन अदा केले जाईल, असे महामंडळाकडून सांगितले जात असले तरी ते केव्हा मिळेल, याची शाश्वती नसते. दरमहा ७ तारखेला पगार दिला जातो. मागील काही महिन्यांपासून पगाराची तारीख टळून जात आहे. वैद्यकीय बिलाबाबतची अनिश्चिततेची त्यात भर पडली आहे.

--इन्फो--

जिल्ह्यातील एकूण आगार :१३

चालक: १९००

वाहक: १८००

अधिकारी : ६५

कर्मचारी १७३५

Web Title: S.T. Employees don't get paid on time, they don't get medical bills!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.