एस.टी. कर्मचाऱ्यांना खात्यात दोन दिवसात वेतन?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:11 AM2021-06-10T04:11:43+5:302021-06-10T04:11:43+5:30
नाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या एस.टी. महामंडळाला राज्य शासनाकडून ६०० कोटी रुपयांची मदत मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या मे महिन्यातील वेतनाचा प्रश्न ...
नाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या एस.टी. महामंडळाला राज्य शासनाकडून ६०० कोटी रुपयांची मदत मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या मे महिन्यातील वेतनाचा प्रश्न मिटला असून येत्या दोन दिवसात कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनाची रक्कम जमा हेाण्याची शक्यता आहे. महामंडळाकडे मदतीची रक्कम वर्ग होण्यास विलंब लागल्यास मात्र पुढील आठवड्यापर्यत प्रतीक्षा करावी लागू शकते.
कोरोनाच्या संकटामुळे राज्यात गेल्या १५ एप्रिलपासून बसेस बंद करण्याची वेळ आल्याने महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बसेसचा वापर करण्याची परवानगी असली तरी त्या माध्यातून महामंडळाला फारसे उत्पन्न मिळू शकले नाही. उत्पन्नाचा मार्गच बंद झाल्यामुळे महामंडळाला खर्च भागविणेदेखील कठीण झाल्याने कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन होते की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या संदर्भात मुंबईत वित्तमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच महामंडळाच्या बैठकीस राज्य शासनाकडून एस.टी. महामंडळाला ६०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील सुमारे ९८ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न तूर्तास मिटला आहे. यानंतर सर्वकाही सुरळीत सुरू राहिल्यास एस.टी.च्या बसेस सुरळीत होऊन उत्पन्नाचा मार्ग सुकर होऊ शकेल. मात्र पुन्हा तिसऱ्या लाटेत काही विपरीत परिस्थिती उद्भवली तर महामंडळाला पुन्हा आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महामंडळाकडून पर्यायी उत्पन्नाचे स्रोत शोधले जात आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जानेवारीत बसेस सुरू झाल्याने महामंडळाची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा लॉकडाऊनची स्थिती ओढवली. त्यामुळे उत्पन्नाचा स्रोत बंद झाल्याने महामंडळापुढे मोठा प्रश्न होता. तूर्तास यातून मार्ग काढण्यात आला असला तरी जसजशी बससेवा पूर्वपदावर येईल तेवढे महामंडळाला उत्पन्न मिळणार आहे. गेल्या दोन वर्षात महामंडळाला दोनदा राज्य शासनाकडून मदत घेण्याची वेळ आली आहे.
--इन्फो--
नाशिक विभागाला लागतात ८ कोटी
नाशिक विभागात सुमारे साडेचार हजार इतके कर्मचारी असून या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर अंदाजे ८ कोटी इतका खर्च करावा लागतो. इतर दैनंदिन खर्चदेखील मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. महामंडळाचे विभागातील जाळे मोठे असून आर्थिक उलाढाल देखील मोठी आहे.