भंगारातून एसटी मालामाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:20 AM2020-12-30T04:20:01+5:302020-12-30T04:20:01+5:30
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने राबविलेल्या भंगार साहित्यांच्या लिलावातून नाशिक विभागला ६ केाटी ४५ लाख ८० रुपयांचे उत्पन्न मिळाले. ...
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने राबविलेल्या भंगार साहित्यांच्या लिलावातून नाशिक विभागला ६ केाटी ४५ लाख ८० रुपयांचे उत्पन्न मिळाले. राज्यातील अन्य विभागापेंक्षा नाशिक जिल्ह्याचे उत्पन्न हे सर्वाधिक राहिले. यापूर्वी कोल्हापूर विभागाला ५ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
राज्य परिवहन महामंडळाने यंदा प्रथमच आपल्या स्तरावर राज्यात सर्वत्र ऑनलाइन पद्धतीने लिलाव प्रक्रिया राबविली. दरवर्षी ही प्रक्रिया त्रयस्थ यंत्रणेमार्फत राबविली जात हाेती. यंदा महामंडळाने स्वत:च लिलाव केल्याने, सर्व उत्पन्न महामंडळालाकडे राहिले. लिलावास पात्र असलेल्या ५३ व्यापाऱ्यांनी या प्रक्रीयेत सहभाग घेतला. लिलावात एकूण १५७ प्रकारचे लिलाव साहित्य लावण्यात आले होते. लिलावातील २०० बसेसमधून २ केाटी ६६ लाख ५ हजार, २० मिनी बसमधून ३६ लाख ४९ हजार इतके उत्पन्न मिळाले. गाड्यांच्या सांगाड्यांचाही लिलाव करण्यात आला, यातून २६ लाख ६५ हजारांचे उत्पन्न महामंडळाच्या तिजोरीत जमा झाले. गेल्या वर्षी झालेल्या लिलावातून नाशिक विभागाला ३ कोटी इतकेच उत्पन्न मिळाले होते.
गेल्या महिन्याभरापासून पेठ रोडवरील एसटी कार्यशाळेत लिलावासाठी काढण्यात आलेल्या साहित्यांचे लॉट लावण्यात आले हेाते. यासाठी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी सर्व प्रकारच्या लॉट लावण्याचे काम केले. ऑनलाइन लिलाव होणार असल्याने, त्याप्रमाणे येथील साहित्यांची माहिती देण्यात आलेली होती. त्यानुसार, व्यापाऱ्यांनी, तसेच त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष येऊन मालाची पाहाणी केली होती. व्यापाऱ्यांनी नंतर ऑनलाइन लिलावात भाग घेतला.
दरम्यान, या लिलाव प्रक्रियेसाठी विभाग नियंत्रक नितीन मैंद, उपयंत्र अभियंता मुकुंद कुंवर, सिचन चाचरे, विश्वनाथ भांबर, प्रणय जाधव, प्रदीप बनकर आदी उपस्थित होते.