भंगार लिलावातून एसटीला मिळाले २ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 01:25 AM2021-07-10T01:25:58+5:302021-07-10T01:27:19+5:30
गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या एस.टी. महामंडळाच्या नाशिक विभागाला भंगार साहित्याच्या लिलावातून २ कोटी १७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. लिलावातील सर्व बसेसवर बोली लागल्याने त्यातूनच जवळपास दीडशे कोटी रूपये महामंडळाला मिळाले आहेत. ई-ऑक्शन पद्धतीने ही लिलाव प्रक्रिया पार पडली.
नाशिक: गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या एस.टी. महामंडळाच्या नाशिक विभागाला भंगार साहित्याच्या लिलावातून २ कोटी १७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. लिलावातील सर्व बसेसवर बोली लागल्याने त्यातूनच जवळपास दीडशे कोटी रूपये महामंडळाला मिळाले आहेत. ई-ऑक्शन पद्धतीने ही लिलाव प्रक्रिया पार पडली.
राज्य परिवहन महामंडळाकडून दरवर्षी दोन प्रक्रिया राबविल्या जातात. त्यातून एस.टी. महामंडळाला कोट्यवधी रूपयांचे उत्पन्न मिळत असते. मागीलवर्षी डिसेंबर महिन्यात भंगार मालाचा लिलाव करण्यात आला होता. नाशिक विभागाने ६ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी केली होती. गुरूवारी (दि.८) झालेल्या मिनी लिलावात २ कोटी १७ लाखांचे उत्पन्न मिळाले.
या लिलावासाठी १४४ विविध प्रकारचे लॉटस लावण्यात आलेले होते. त्यातील ८९ लॉटसला बोली लागली त्यातून महामंडळाला उत्पन्न मिळाले. लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या सर्व बसेस तसेच बसेसच्या सांगाड्यांना बोली लागल्याने महामंडळाला त्यातूनच १ कोटी ३४ लाखांची रक्कम मिळाली. जवळपास ३० पेक्षा अधिक जणांनी या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला.
पेठरोड येथील कार्यशाळेत झालेल्या लिलावप्रसंगी विभाग नियंत्रक राजेंद्रकुमार पाटील, उपयंत्र अभियंता (चालन) मुकुंद कुंवर, उपयंत्र अभियंता सचिन चाचरे, प्रशांत पदमने, वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी अजित भारती, विभागीय भांडारपाल उपेंद्र मोरे, चार्जमन विश्वनाथ भांबर आदी उपस्थित होते.
या लिलावात ॲल्युमिनियम पत्रे, पाटे, रबर टस्ट, पॉवर स्टेअरिंग, ऑईल ड्रम, क्लच प्लेटस, लोखंडी ब्रास, मिनी बसेस, बसेसचे सांगाडे ठेवण्यात आले होते. महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर लिलावाची माहिती देण्यात आली होती. या लिलावात ३६ व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला.